अभिरुचीसंपन्न संगीत नाटकांची जोपासना व्हावी मेधा कुलकर्णी यांचे आवाहन
पुणे : नाट्यसंगीत ही महाराष्ट्रातील सकस कला आहे. नाट्यसंगीताची आवड पुढील पिढीकडून जोपासली जावी. कलावंत आणि रसिकांपर्यंत उत्तम गोष्टी पोहोचविल्या तर अशा अभिजात कलांची जपणूक होण्यास मदतच होईल. भविष्यकाळात संगीत नाटके रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन माजी आमदार, भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी केले.
स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणेतर्फे ज्येष्ठ ऑर्गनवादक कै. चंद्रशेखर देशपांडे स्मृती राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रातिनिधीक स्वरूपात पारितोषिक आणि प्रमाणपत्र वितरण ज्येष्ठ गायक अभिनेत्री मधुवंती दांडेकर आणि मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी कुलकर्णी बोलत होत्या. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चारुशीला केळकर, उपाध्यक्षा सुचेता अवचट, दुर्मिळ वस्तूंचे संग्राहक दशरथ वाणी उपस्थित होते.
कुलकर्णी पुढे म्हणाल्या, महाराष्ट्राला संगीत नाटकांची गौरवशाली परंपरा लाभलेली असून संगीत नाटकांना आजच्या काळातही रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो, हे आपण प्रत्यक्ष अनुभवले आहे. अभिरुचीसंपन्न संगीत नाटकांची आवड जोपासली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
स्वरराज छोटा गंधर्व यांच्या आठवणींना उजाळा देताना मधुवंती दांडेकर म्हणाल्या, छोटा गंधर्व यांच्याकडून नाट्यसंगीतातील बारकावे, हरकती शिकण्याचे भाग्य मला लाभले. शिष्याला मार्गदर्शन करण्याची त्यांची वेगळी धाटणी होती. ते शिष्याला समोर बसवून त्याच्याकडून घोकंपट्टी करवून न घेता गायनातील बारकावे कसे उचलावे ही दृष्टी शिष्याला देणे महत्त्वाचे मानत. संगीत नाटक सादर करताना सुरांबरोबरच शब्दांकडेही अतिशय कटाक्षाने लक्ष दिले जावे, असा बहुमोल सल्ला दांडेकर यांनी नवोदित गायकांना दिला.
सुरुवातीस स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान आयोजित नाट्यगीत गायन स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका चारुशीला केळकर यांनी विषद केली. मेधा कुलकर्णी यांचा सत्कार मधुवंती दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. सुचेता अवचट यांनी आभार मानले.
