पुस्तकांचे पंख लावून उंच भरारी घ्या- प्रा. मिलिंद जोशी

पुणे : माणसांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्याची शक्ती पुस्तकांमध्ये आहे. कोरोनाच्या उद्ध्वस्त करणा-या वातावरणात पुस्तकांनी लोकांना उभारी देण्याचे काम केले आहे.  आपल्या आयुष्यात आलेली संकटे पुस्तके दूर करू शकत नाहीत, परंतु संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग पुस्तके दाखवतात. पुस्तकाचे पंख लावून आपण उंच भरारी घेऊ शकतो. जे पुस्तके वाचतील त्यांच्या पंखात उडण्याचे बळ येईल, असे मत साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

बुधवार पेठेत काम करणारी सहेली संघ ही संस्था आणि मैत्र युवा फाऊंडेशनने देहविक्री करणा-या महिलांसाठी ‘विचारांची पुस्तकपेटी’ हा अनोखा उपक्रम सुरु केला. यावेळी सहेली संघच्या संचालिका तेजस्वी सेवेकरी, मैत्र युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, सहेली संघच्या अध्यक्षा महादेवी मदार आदी उपस्थित होते. 

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या दुःखाला खूप सजवतो. परंतु पुस्तके वाचल्यानंतर आपल्याला कळते की आपल्यापेक्षाही मोठे दुःख या जगात आहे. आनंदाचे ही वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. शरीराचे पोषण होणे जसे आवश्यक आहे, तसेच   मनाचे आणि बुद्धीचे भरण पोषण होणे देखील गरजेचे असते, त्यासाठी पुस्तके उपयुक्त ठरतात.

तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, देहविक्रीच्या व्यवसायात महिलांनी येण्याची शारिरीक हिंसा, शिक्षणाचा अभाव, गरीबी अशी अनेक कारणे आहेत. त्यांचा मानसिक विकास व्हावा, त्यांचे विचार परिवर्तन व्हावे, याउद््देशाने हा उपक्रम हाती घेतला गेला आहे. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये मराठी, हिंदीसह बंगाली, तमीळ आदी भाषा बोलणा-या व वाचू शकणा-या महिलांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेतील पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.

संकेत देशपांडे म्हणाले, महिलांनी पुस्तक पेटीतून आवडतील अशी पुस्तके घेऊन वाचावी, हा यामागील उद््देश आहे. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या व मान्यवरांच्या कार्याची माहिती देणारी पुस्तके पेटीमध्ये आहेत. 

साहित्यिक व लेखक, प्रकाशकांनी आपली पुस्तके देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. त्याकरीता तेजस्वी सेवेकरी मो. ९८८१४०४८११, संकेत देशपांडे मो. ९८५०५०२७२९ या क्रमांकावर संपर्क साधावा.  

Leave a Reply

%d bloggers like this: