Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

ओबीसी आरक्षण – आता सत्तेवर आलात, भविष्यात जनता दारात उभं करणार नाही, पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडीवर हल्ला

पुणे : या सरकारचा मला सांगायचंय, चुकून तुम्ही राज्यात सत्तेवर आलात भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. सरकारने फक्त 15 महिने गोल गोल फिरवलं, कुठलाही डाटा कोर्टात जमा केला नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर केली. तसंच आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार देखील केला. त्या पुण्यात बोलत होत्या.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. पुण्यातील कात्रज चौकात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर,आमदार माधुरी मिसाळ, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहर अध्यक्ष योगेश पिंगळे यांसह खासदार, आमदार, नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी  व कार्यक्रते उपस्थित होते

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका… संघर्षाची भावना तुटू देऊ नका… ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. भविष्यातल्या संघर्षासाठी आम्ही तयार आहोत.”

मी मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते… ओबीसीचे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरती गेले… याच्याविषयी कोर्टाच्या तारखा चालू होत्या… ते आरक्षण कसे योग्य आहे हे सांगण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये काही डाटा सबमिट करत होतो… आम्ही काही सर्व्हे करत होतो… आम्हाला कोर्टाने वेळ दिला होता… तेवढ्यात आचार संहिता लागली त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि जवळपास पंधरा महिने झालं हे सरकार फक्त कोर्टाकडून तारखाच घेत आहे… इंपिरिकलच्या आधारे कृष्णमूर्ती यांच्या मतांच्या आधारावर सरकारने हा सगळा डाटा सबमिट करावा असं त्यांनी सांगितलं पण या सरकारने पंधरा महिन्यांमध्ये कुठलाही डाटा तयार केला नाही… सरकार फक्त गोल गोल फिरवतंय, असं म्हणत सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

महाराष्ट्रभर आज चक्काजाम होतोय. भाजपाच्या आंदोलनानंतर सरकारी पक्षांमधील एका पक्षाने आंदोलनाची घोषणा दिली. मंत्री आज आंदोलनाची भाषा करतायत. शोभतं का तुम्हाला? आम्ही मंत्री असताना आंदोलन केलं का हो? आम्ही आरक्षण दिलं, आरक्षणाला संरक्षण दिलं…मंत्र्यांनी आंदोलन नाही तर निर्णय करायचे असतात… आंदोलन करायला विरोधी पक्ष आहे…, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ यांनीही महाविकास आघाडी सरकारच्या गोंधळामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याचा आरोप केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading