दूरदृष्टी आणि गुणग्राहकता हेरणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज – डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : अस्पृश्यता निवारणासह श्रमिक, शेतकरी कामगारांच्या दुःखमुक्तीसाठी शाहू महाराजांनी अंतापर्यंत प्रयत्न केले. दूरदृष्टी आणि गुणग्राहकता हेरणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय, असे मत माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचतर्फे यंदाचा छत्रपती शाहूजी महराज पुरस्कार 2021 पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधीपक्षनेते अरविंद शिंदे यांना सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. सबनीस बोलत होते. महात्मा फुले पगडी, तिरंगी शाल आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका लता राजगुरू, कमल व्यवहारे, नगरसेवक रफिक शेख, नगरसेविका सुजाता शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते महेबूब नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले की, राजेशाही व्यवस्थेतही जनकल्याणकारी धोरण राबवून शाहू महाराजांनी प्रजेचे हित पाहिले. सहकार, उद्योग, व्यवसाय, कला, क्रीडा, कुस्ती यांना त्यांनी उत्तेजन दिले. बालगंधर्वांसह अनेकांना महत केले तसेच छत्रपती शाहू महाराजांनी रंगभूमीचे पांग फेडले. मागास लोक आणि कामगारांसाठी कल्याणकारी कायदे बनवले. सक्तीचे व मोफत शिक्षण दिले आणि विद्यार्थी वसतिगृह योजना राबवली. डॉ. आंबेडकरांना आर्थिक मदत देऊन त्यांचे उच्च शिक्षण छत्रपती शाहू महाराजांनी पूर्ण केले. दलितांचा उद्धारकर्ता नेता म्हणून त्यांची ओळख रूजवली. जनकल्याणाचे पुण्य पेरणारे शाहू महाराज वंदनीय आहेत. अस्पृश्यता निवारणासह श्रमिक, शेतकरी कामगारांच्या दुःखमुक्तीसाठी शाहू महाराजांनी अंतापर्यंत प्रयत्न केले. वेदोक्त प्रकरणामुळे ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद वाढला. पण त्यामुळेच दलित मुक्तीला चालना मिळाली. पन्नास टक्के आरक्षण देणारा पहिला राजा म्हणून छत्रपती शाहू महाराजांचे नाव घेतले जाते.

पुरस्काराला उत्तर देतांना अरविंद शिंदे म्हणाले की, ख-या अर्थाने दूरदृष्टी लाभलेले असे शाहू महाराज होते. आंबेडकरांच्या विव्दत्तेविषयी कानावर माहिती आली असता त्यांच्या उच्च शिक्षणाचा सर्व खर्च उचलून दलित समाजाचा उद्धारकर्ता आणि भारतमातेचा संविधानकर्ता त्यांनी घडवला. छत्रपती शाहू महाराज हे कोणत्या एका समाजापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्यात गुणग्राहकता होती. ज्या समाजातील ज्या व्यक्तीमध्ये क्षमता आहेत, त्या व्यक्तीला त्याचे योग्य स्थान, प्रतिष्ठा आणि संधी मिळालीच पाहिजे, यासाठी ते आग्रही होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे संस्थापक विठ्ठल गायकवाड यांनी केले. युवा नेते कुणाल राजगुरू यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: