पुढील चार दिवस कोकणात अतिवृष्टी, विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे – महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. कालपासून मान्सून मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये दाखल झाला आहे. पुढील चार दिवस कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा  इशारा देण्यात आला आहे. हा इशारा पुणे हवामान वेधशाळेनं दिला  आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मान्सूनचा पाऊस शनिवारी महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सूनच्या पावसानं जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी भागात द्रोणीय क्षेत्र तयार झाल्यानं पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, पुणे जिल्ह्यातही पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानं उद्यासाठी रायगड जिल्ह्यासाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे. तर पुढील चार दिवसांसाठी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गसाठी ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भात 15 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होईल, असा हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र, हवामान विभागाला हुलकावणी देत, आधीच मान्सून विदर्भात पोहचला. हवामान विभागानं विदर्भात मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर केलंय. 11 तारखेपासून 13 तारखे पर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. मान्सूनच्या आगमनानं शेतकरी आणि सर्वसामान्य सुखवलाय. सोबतच या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक डॉ. मनमोहन साहू यांनी याविषयी माहिती दिली आहे.

आज 9 तारखेला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बहुतांशी भागात पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार होणार आहे, असं हवामान खात्याच्या प्रादेशिक विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी  माहिती दिली .

Leave a Reply

%d bloggers like this: