Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

संकटांना आव्हान देणारा समाज निर्माण व्हायला हवा – क्षितिज पाटुकले

पुणे : आजच्या काळातील हे संक्रमण केवळ कोरोनाचे नाही तर सांस्कृतिक, भावनिक असे हे संक्रमण आहे. सामूहिक समाजमन नासविण्याचे काम कोरोनाने केले आहे. परंतु संकटे येऊ नयेत ही प्रार्थना करण्यापेक्षा संकटांना आव्हान देणारा समाज पुढच्या काळात निर्माण व्हायला हवा. आपल्या सामर्थ्याचा आणि सक्षमतेचा वापर जास्तीत जास्त व्हायला हवा, असे मत विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष क्षितिज पाटुकले यांनी व्यक्त केले.

कै. शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या शाहिरी प्रवासात ज्यांनी त्यांना सहयोग दिला, त्या कलाकारांचा सन्मान शाहीर हिंगे लोककला  प्रबोधिनीच्या वतीने करण्यात येतो. यंदा ढोलकीपटू सचिन गोखले यांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी वृद्ध साहित्यिक कलावंत मानधन निवड समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कोठावदे, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे उपस्थित होते. शशिकांत कोठावदे यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला  यावेळी शाहीर जालिंदर शिंदे  यांचा नमन तुज शाहीरा हा विशेष कार्यक्रम सादर झाला. चेतन हिंगे, सुरेश तरलगट्टी, मुकुंद कोंडे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला.

क्षितिज पाटुकले म्हणाले, कीर्तन, शाहिरी, पोवाडे या सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व कोरोनाकाळात अधोरेखित होत आहे. या काळात तंत्रज्ञानाचा शस्त्र म्हणून उपयोग होतोय. संस्कारक्षम समाज निर्माण होण्यासाठी परंपरांचे आधुनिकीकरण होणे गरजेचे आहे.असेही त्यांनी सांगितले. 

हेमंतराजे मावळे म्हणाले, शाहिरांच्या प्रश्नासाठी शाहिरी संस्था लढत नाहीत. कलावंतांचे संघटन होणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात आज शाहिरीशी संबंधित अनेक संस्था आहेत परंतु या संस्था लोककलेचा प्रसार आणि प्रचार करण्यात मागे पडत आहेत. शाहिरीचा प्रसार व्हायला हवा. यासाठी प्रत्येकाने आपला योग्य वाटा उचलून शाहिरीचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.  शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी ही तळात राहून शाहिरीसाठी काम करणारी संस्था आहे, यापुढेही संस्थेचे कार्य असेच सुरू राहणार आहे.

शाहीर होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संगीता मावळे यांनी प्रास्ताविक केले. अरुणकुमार बाभूळगावकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading