Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख रूपयांची आर्थिक मदत

मुंबई, दि. १ – कोरोना  विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी  पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. मृत्युमुखी  पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री ॲड. परब यांनी केली. त्याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढिवण्यात आल्याचे त्यांनी जाहिर केले.

एसटीचा मंगळवारी, १ जून २०२१ रोजी ७३ वा वर्धापनदिन पार पडला.  महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने  व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ॲड. परब म्हणाले, कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून महामंडळाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, असे सांगतानाच महामंडळासमोर कितीही अडचणी आल्या तरी एकाही कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागणार नाही, अशा शब्दात अ‍ॅड. परब यांनी कामगारांना आश्वस्त केले. सद्या एसटी प्रतिकुल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असली तरी येत्या काही वर्षांमध्ये एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना हाती घेतल्या जातील, असे सांगतानाच राज्यातील सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी पुन: एकदा उभारी घेईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मोठे अर्थचक्र असलेल्या या राजधानीत कोरोनाकाळात प्रवासी वाहतूकीचा पडलेला भार कमी करण्यासाठी बेस्टच्या मदतीला एसटी धावून आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्‍यांबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी सुमारे एक हजार एसटी मुंबईच्या रस्त्यावर धावत होत्या. त्यासाठी सुमारे चार हजार चालक व वाहक रस्त्यावर उतरले होते. या सेवेच्या माध्यमातून महामंडळाला प्रतिदिन १ कोटी रूपयांचा महसूल मिळत होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी केवळ त्‍यांच्या आरोग्याचा विचार करून बेस्टच्या सेवेतून एसटी बसेस काढून घेण्यात आल्याचे मंत्री, ॲड. परब यांनी सांगितले.

 

  • एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सहा महिन्यांत नोकरी
  • महाकार्गोच्या चालकांना १५० रूपये भत्ता

– प्रवासी ग्राहक हा दैवत असून त्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी राज्यातील तालुक्यांना जोडली जाणाऱ्या काही १०० प्रमुख स्थानकांवर लवकरच आरओच्या माध्यमातून स्वच्छ पाणी देणार.

– एसटी स्थानकांवर मोठी स्वच्छतागृहे बांधणार. या स्वच्‍छतागृहांच्या स्वच्छतेसाठी थोडासा दर आकारून लोकांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येईल. त्यादृष्टीकोनातून येत्या काही दिवसांत योजना आणली जाईल. तसेच बसस्थानकांचा परिसरही स्वच्छ ठेवला जाईल.

– प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य शासनाने नवीन बसगाड्या घेण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. येणाऱ्या काळात जवळपास अडीच हजार गाड्या घेणार आहोत. यामध्ये पर्यावरवणपूरक अशा इलेक्ट्रीक बस, एलएनजी, सीएनजी, साध्या तसेच आराम गाड्यांचा समावेश असेल.

–  राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध केलेल्या योजना, सेवा तसेच महामंडळाची विविध माहिती अधिकाधिक प्रवाशांपर्यत पोहोचवण्यासाठी एसटीने आपले स्वतःचे ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम व टेलीग्राम या समाजमाध्यमांवर आपले अधिकृत खाते उघडले आहे. ॲड. परब यांच्या हस्ते एसटीच्या फेसबुक,इंन्स्टाग्राम व टेलग्राम या समाजमाध्यमांचा शुभारंभ केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading