प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि ई कचऱ्यावर होणार प्रक्रिया
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ईसीएसोबत करार… पुर्नवापर, संकलन आणि जनजागृती करणार
पुणे – प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाबरोबरच ई-कचऱ्याची मोठी समस्या सध्या सर्वांना भेडसावत आहे. या ई कचऱ्याचे संकलन, त्यावर पुर्नप्रक्रिया करून होणारा वापर आणि व्यापक जनजागृतीसाठी जिकिरीचे बनले आहे. यासाठी पर्यावरण संवर्धन असोसिएशन (ईसीए) या स्वयंसेवी संस्थेने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. ई कचऱ्यावर आधारित विविध उपक्रम राबविण्याबरोबरच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करण्यासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ईसीएला भोसरी स्थानांतरण केंद्राशेजारी जागा देण्यात आली आहे. पिं.चिं. महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि ईसीएचे अध्यक्षा विनीता दाते यांनी करारावर स्वाक्षरी केली. ईसीएचे विश्वस्त तसेच जेष्ठ पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची याकरिता समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ, आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) चे मोलाचे सहकार्य मिळाले. ईसीएबरोबरच पिंपरी-चिंचवड प्लास्टिक असोसिएशन, ईवेस्ट ग्लोबल या संस्था सहभागी होणार आहेत. पिं.चिं. मनपा आयुक्त राजेश पाटील तसेच माजी आयुक्त श्रवण हर्डीकर, अभियंता संजय कुलकर्णी, एमपीसीबी आणि एमआयडीसीचे पदाधिकारी यांचे आभार यावेळी नितीन देशपांडे यांनी मानले.
या प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ई कचऱ्याचे संकलन, पुर्नवापर अणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच हॉबी सेंटरच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री येथे होणार आहे.
त्याचप्रमाणे बायोगॅस निर्मिती, कंपोस्टींग, सौर उर्जा उपकरणे, प्लास्टीकपासून इंधन निर्मिती असे पथदर्शी प्रात्याक्षिके इथे दाखविण्यात येणार आहेत. पावसाच्या पाण्याचे पुर्ननियोजनाबरोबरच सौर उर्जेवर चालणा-या अनेक गोष्टींच्या वापराद्वारे हि इमारत बांधण्यात येणार असून संपुर्ण परिसर पर्यावरणपूरक व हरित असण्यासवर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पर्यावरणतज्ञ आणि पर्यावरण प्रेमी यांच्यासाठी हा प्रकल्प एक महत्वाची पर्वणी ठरणारा आहे.
जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची आणि तातडीने तोडगा काढण्याची गरज असलेली समस्या म्हणजे ई-कचरा होय. ई-कचऱ्याची तीन टप्प्यांमध्ये विल्हेवाट लावली जाते. वस्तूचा वापर कमी करणे, त्याचा पुर्नवापर करणे किंवा वस्तू पुन्हा वापरात आणण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करणे (रिसायकल) अशा तीन टप्प्यांचा त्यात समावेश आहे. हा प्रकल्प विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना ई-कचरा आणि प्लास्टिक पुर्नवापराविषयी जनजागृती करण्यासाठी आणि पुन्हा वापरण्यायोग्य ई-कचरा आणि पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून उत्पादनांच्या विकासासाठी गुंतवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
ई कचऱ्याचे विघटन आणि पुर्नवापर याबाबत विद्यार्थी व नागरिकांना लघूपटाच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. तसेच शाळांना या केंद्रात भेट घडवून ई कचऱ्याविषयी जागृत केले जाणार आहे. याविषयी संशोधन आणि मार्गदर्शनासाठी विशेष सहाय्य केले जाणार आहे. आम्ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत १५ वर्षासाठी करार केला आहे. ई कचऱ्याचे कलेक्शन सेंटर भोसरी एमआयडीसी परिसरात उभारण्यात आले आहे.
- जेष्ठ पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे (समन्वयक व विश्वस्त, ईसीए)
