दहावीची परीक्षा रद्द , निकाल जून अखेरीस
मुंबई, दि. २८ : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची दहावीची परीक्षा ही रद्द करण्यात आली असून परिक्षेस पात्र सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जून अखेरीस लावण्याचे नियोजन असून अकरावी प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा (CET) घेण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थी, परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही प्राथमिकता ठेवून राज्य मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने इयत्ता नववी व इयत्ता दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना निश्चित केली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०–२१ साठी इयत्ता दहावी परीक्षेच्या अंतिम निकालाचे निकष
- विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
- विद्यार्थ्यांचे दहावीचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण
- विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण (इयत्ता नववी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश व इयत्ता दहावी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश)
पुनर्परीक्षा आणि श्रेणीसुधार
पुनर्परीक्षार्थी ( Repeater Student), खाजगी ( फॉर्म नं. १७), तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठी देखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजने (Class Improvement) अंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
अकरावी परीक्षेसाठी प्रवेश परीक्षा
अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. एकूण १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व ओएमआर पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.
