Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यातील लॉकडाऊन १५ जून पर्यंत वाढवला; १ जूनला नियमावली जाहीर होणार – राजेश टोपे

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील नियमावली १ जूनला जाहीर करण्यात येईल. तर पुण्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेवरील असलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांसाठी वाढवण्यात आलेला आहे. परंतु त्यासाठीची नियमावली १ जूनला जाहीर करण्यात येईल. ज्या ठिकाणी जास्त रुग्णसंख्या असेल, पॉझिटिव्हीटी रेट जास्त असेल, तसेच बेड्स उपलब्धतेत अडचणी येत असतील, त्या ठिकाणी लॉकडाऊन जास्त शिथिल केला जाणार नाही. परंतु ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे, त्या ठिकाणी १ जूनला मार्गदर्शक सूचना काढण्यात येतील. त्या अनुषंगाने येथील महापौर आणि अन्य लोकांनी सूचना केल्या आहेत. त्याचा विचार निश्चित पण केला जाईल,’ असे राजेश टोपे म्हणाले.

तसेच पुढे टोपे म्हणाले की, ‘शनिवार आणि रविवारी पुण्यात दवाखाने आणि मेडिकल वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला होता. पण शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधा सुरू ठेवाव्या, अशी सर्व लोकप्रतिनिधींची इच्छा होती. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील हा आग्रह केला होता. त्यामुळे आता शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेवर असलेले निर्बंध टाकून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

‘दरम्यान पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. येथील कोरोनाची परिस्थिती समाधनकारक आहे. तसेच पुण्यातील होम आयसोलेश कमी झाले आहे,’ अशी माहिती टोपे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading