मराठा समाजाबाबत ६ जूनपर्यंत ठोस भूमिका घ्या, अन्यथा रायगडावरून आंदोलन – खासदार संभाजीराजे छत्रपती
मुंबई, दि. 28: मराठा समाजाबाबत ठोस भूमिका ६ जूनपर्यंत स्पष्ट करा अन्यथा रायगडावरून आंदोलनाला सुरूवात करू, मग आम्ही कोरोना वगेरे काहीच पाहणार नाही, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. दुपारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आता मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही जबाबदारी लोकांची नसेल तर ही जबाबदारी आमदार आणि खासदारांची असेल. आज शिवाजी महाराज असते, तर मावळ्यांना टाकले असते का ? असाही सवाल ही त्यांनी केला. तसेच येत्या ९ ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्ताने मराठा आरक्षणाच्या विषयावर गोलमेज परिषदही भरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीने दोन दिवसांचे अधिवेशन मराठा आरक्षणाच्या निमित्ताने घ्यावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले .
सुचविले तीन पर्याय
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत पुर्नयाचिका दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. याआधीची तारीख ४ मार्च होती. पण कोरोनामुळे ही तारीख आता पुढे निघून गेली आहे. त्यामुळेच संभाजी राजे यांनी सरकारला तीन पर्याय सुचविले आहेत.
१. पुर्नयाचिका दाखल करा, ही याचिका लोकांना दाखवायला नको, फुलप्रुफ असायला हवी
२. क्युरेटिव्ह पिटिशनचाही शेवटचा पर्याय ठेवा, त्यासाठी तयारीशिवाय जाता येणार नाही
३. या पर्यायाअंतर्गत केंद्राकडे जाऊ शकतो, ही जबाबदारी राज्याची आणि केंद्राची आहे.
नवीन पक्षाच्या स्थापनेचे संकेत
बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवीन राजकीय पक्ष स्थापन करू, असे संकेत आज संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत दिले. गेल्या अनेक दिवसांपासून संभाजी राजे महाराष्ट्र दौरा करीत आहे. यावेळी त्यांनी अनेक बड्या नेत्यांबरोबरच कायदेतज्ज्ञांचीही भेट घेतली. ते नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा होती. मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी संभाजीराजे हे नवा पक्ष स्थापन करू शकतात. इतकंच नाहीतर ते मराठा तसेच बहुजन समाजाला एकत्र आणत आरक्षणाचा मुद्दा लावून धरू शकतात. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया कॅम्पेन सुरू केले आहे.
