Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज राहा – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

पुणे दि.28 :- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने उपाययोजना प्रभावीपणे राबवत संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. कोरोनाशी एकजुटीने सामना करू असा विश्वासही  त्यांनी यावेळी  दिला.

विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, टास्क फोर्सचे डॉ. डी. बी. कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर आदी उपस्थित होते.

गृहमंत्री  वळसे-पाटील म्हणाले, पहिल्या लाटेच्या तुलनेत आरोग्य विषयक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे निश्चितच फायदा होतो आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे सुविधा निर्माण झाल्या आहेत. म्युकरमायकोसीस या नवीन आजाराची भर पडली आहे. हा आजार अचानक उद्भवतो. त्याचे उपचार महागडे आहेत त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, पुणे जिल्ह्याने लसीकरणामध्ये आघाडी घेतली आहे. लसीकरणासोबतच कोरोना चाचण्या वाढविण्याची गरज आहे.

कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून जादा बिलाची आकारणी  होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे बिल आकारणी होते की नाही याबाबत दररोज तपासणी करावी. जादा बिल आकारणी करणा-या रुग्णालयांवर कारवाई करा. ज्या रुग्णांलयाबाबत जादा बिल आकारणीच्या जास्त तक्रारी आहेत त्या रुग्णालयांची प्रत्येक बिलाची तपासणी करावी. असे निर्देश त्यांनी दिले.

ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना देत आरोग्य मंत्री  श्री. टोपे म्हणाले आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील नागरिकांना गृह विलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा,  संस्थात्मक विलगीकरणामुळे रुग्णाची दैनंदिन तपासणी होवून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निश्चितपणे वाढेल. तसेच म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारांसाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन लवकरच उपलब्ध होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading