माणूस माणुसकीने वागायला लागेल तेव्हा कोरोना नष्ट होईल- शाहीर दादा पासलकर
पुणे : कोरोनाने माणसाला कसे जगायचे हे शिकवले. जोपर्यंत जगातील शेवटचा माणूस शहाणा होत नाही, तोपर्यंत कोरोना जाणार नाही. माणूस माणुसकीने वागायला लागेल, तेव्हा कोरोना ख-या अर्थाने नष्ट होईल. त्यामुळे कोरोनाला नावे ठेवण्यापेक्षा या परिस्थितीशी लोककलाकारांसह सर्वांनीच लढायला हवे, असे मत महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर यांनी व्यक्त केले.
गणेशोत्सवातील उत्साही कार्यकर्त्यांचे व्यासपीठ असलेल्या विधायक पुणे तर्फे विश्रामबाग वाडयाजवळील झांजले विठ्ठल मंदिरात प्रातिनिधीक स्वरुपात २० लोककलाकार, वारकरी आदींना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. यावेळी इस्कॉन पुणे, अन्नामृत फाऊंडेशनचे संजय भोसले, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, आनंद सराफ, विठ्ठल मंदिराचे अखिल झांजले, हेमंत जाधव, डॉ.धर्मराज साठे आदी उपस्थित होते.
सुरेश लक्ष्मण जोशी यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने हा शिधा देण्यात आला. राकेश कोकाटे, डॉ.स्वप्निल शेठ, उमेश सोनेरी, कपिल कासवा, सारंग सराफ आदींनी संयोजनात सहभाग घेतला.
दादा पासलकर म्हणाले, मानवी जीवनात प्रपंचासोबत परमार्थ देखील महत्वाचा आहे. काही लोकांमध्ये देण्याची भावना अजिबात नाही, हे या काळात दिसून आले. लोककलाकारांकडे जनजागृतीचे मोठे साधन आहे. त्याद्वारे कलाकारांनी कोरोना व यांसारख्या संकटांविषयी जनजागृती करायला हवी.
संजय भोसले म्हणाले, लाखो वर्षांची परंपरा आपल्याला देण्याची भावना शिकवते. स्वत:चा विचार न करता दुस-यांचा विचार करणे गरजेचे आहे. लहान मुलांना धार्मिक शिक्षण मिळायला हवे. तरच, त्यांच्यामध्ये सद््भावना जागृत राहिल. मंदिरांनी लोकांमधील सद््भावना जागृत ठेवण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. आनंद सराफ म्हणाले, कोरोनाच्या काळात प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे. मात्र, माणसाच्या मना-मनामध्ये अंतर असता कामा नये. आपल्याकडील जास्तीचे दुस-याला देणे सातत्याने सुरु रहायला हवे.
