Saturday, May 30, 2026
Business

ग्रीनको ग्रुप करत आहे १००० मोठ्या वैद्यकीय श्रेणीच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची पहिली हवाई मालवाहतूक

हैदराबाद – भारतातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी, हैदराबाद-स्थित ग्रीनको ग्रुपने देशात सध्या अत्यंत निकडीच्या असलेल्या ऑक्सिजन सहायता प्रणाली आणण्यासाठी आपले जागतिक पुरवठा शृंखला नेटवर्क उपयोगात आणले आहे. देशाला ऑक्सिजन पुरवठा तातडीने होण्याची नितांत गरज आहे आणि त्यासाठी ग्रीनको ग्रुप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांच्या पाच विशेष कार्गो विमानांपैकी पहिले आज हैदराबाद येथे २०० मोठ्या मेडिकल ग्रेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्ससह दाखल झाले. या कॉन्सन्ट्रेटर्सची क्षमता प्रति मिनिट १० लिटर असून संसर्गाच्या महाभयानक दुसऱ्या लाटेविरोधात भारताच्या लढ्यात हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स अतिशय मोलाचे ठरणार आहेत.

तेलंगणाचे नगरपालिका प्रशासन आणि शहरी विकास, उद्योग व आयटी ईअँडसी विभागांचे माननीय मंत्री के. टी. रामा राव यांनी प्रधान सचिव सोमेश कुमार यांच्या समवेत राज्याच्या वतीने विमानाचे स्वागत केले. ग्रीनकोचे सह-संस्थापक अनिल चलमालाशेट्टी आणि महेश कोल्लि हे देखील कार्गो विमानाची पहिली खेप विमानतळावर उतरत असताना त्याठिकाणी उपस्थित होते.

ग्रीनको ग्रुपचे एमडी व सीईओ  अनिल चलमालाशेट्टी यांनी विमानतळावर उपस्थित पत्रकारांना ग्रीनको ग्रुपच्या योजनांबद्दल माहिती देताना सांगितले, “गेल्या दोन आठवड्यात आम्ही निर्माण केलेल्या सक्षम जागतिक पुरवठा शृंखलांमार्फत आम्ही आणत असलेल्या पाच विशेष कार्गो विमानांपैकी हे पहिले विमान आहे. पुढील ५ दिवसात आणखी चार विशेष विमाने हैदराबाद, बेंगळुरू आणि नवी दिल्ली येथे अशाच १००० मोठ्या मेडिकल ग्रेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्ससह दाखल होतील. यामुळे द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांमधील आपल्या वैद्यकीय चमूंना रुग्णांना प्री-आयसीयू सहायता व आयसीयूतून बाहेर आल्यानंतर त्यांची तब्येत स्थिर राखण्यात मदत मिळेल व आपल्या आरोग्यसेवा पायाभूत सेवासुविधा आणि मदत यंत्रणांवर प्रचंड मोठा ताण ज्यामुळे आला आहे त्या कोविडच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी अधिक जास्त बळ मिळेल. देशसेवेचे, महामारीविरोधात लढण्याचे आणि देशाला पुन्हा मोकळा श्वास घेता यावा यासाठी मदत करण्याचे आमचे कार्य आम्ही असेच सुरु ठेवू.”

माननीय मंत्री  के. टी. रामा राव यांनी ग्रीनको संस्थापकांचे या प्रयत्नांबद्दल आभार मानले. ते म्हणाले, “सरकार, उद्योजक आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले पहिले कर्तव्य रुग्णांची मदत करणे आणि जितक्या तातडीने व सक्षमतेने शक्य होईल तशी या ऑक्सिजन समस्येवर मात करणे हे आहे. ग्रीनको ग्रुपचे हे प्रयत्न अतिशय वाखाणण्याजोगे आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading