धक्कादायक! काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
पुणे, दि. 16 – काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
निशब्द !
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 16, 2021
आज एक ऐसा साथी खो दिया जिसने सार्वजनिक जीवन का पहला कदम युवा कांग्रेस में मेरे साथ रखा और आज तक साथ चले पर आज…
राजीव सातव की सादगी, बेबाक़ मुस्कराहट, ज़मीनी जुड़ाव, नेत्रत्व और पार्टी से निष्ठा और दोस्ती सदा याद आयेंगी।
अलविदा मेरे दोस्त !
जहाँ रहो, चमकते रहो !!! pic.twitter.com/5N94NggcHu
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असलेल्या राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते.
राजीव सातव यांचा परिचय
45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते.. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.
राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती.
