सुलतान उर्फ टिप्या शेख टोळीतील दहा जणांवर मोक्का
पुणे – मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत शहरात पोलिसांनी तिसावी कारवाई केली आहे. चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलावर धारदार हत्यारांनी वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणार्या व ताडीवाला रोड परिसरात दहशत माजविणार्या तडीपार गुंड सुलतान उर्फ टिप्या लतीफ शेख याच्यासह त्याच्या नऊ साथीदारांवर मोक्का कायद्ययान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. २०२१ या वर्षातील अवघ्या चार महिन्यात करण्यात आलेली ही २५ वी कारवाई आहे.
टोळी प्रमुख टिप्या, विनोद उफई विन्या सुनिल वाघमारे, साहील उर्फ सोन्या राजु वाघमारे, श्याम किशोर काळे, शुभम अनिल धिवार, रामनाथ उर्फ पापा मेनीनाथ सोनवणे, सागर उर्फ सॉगी किशोर गायकवाड, अनिकेत किशोर खंदारे, सौरभ तिमाप्पा धनगर आणि अतुल श्रीपास म्हस्कर उर्फ सोनु परमार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ९ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून टोळी प्रमुख टिप्या अद्यापही फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिप्या तडीपार असताना त्याने बंडगार्डन पोलेरस ठाण्याच्या हद्दीत येऊन साथीदारांच्या मदतीने गौरव पुजारीच्या खुनाचा प्रयत्न केला. त्याने टोळीच्या वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी पोलीस ठाण्याच्यास हद्दीत गुन्हे केलेले आहेत. त्याच्या टोळीवर खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्र बाळगणे, दरोड्याचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काचा प्रस्ताव सादर करून अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्यासमोर मंजुरीसाठी सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या मोक्काच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. गुन्ह्याचा तपास लष्कर विभाग सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे करीत आहेत.
