‘निरंजन’च्या साथीने गरजू वधू-वर घेणार ‘सप्तपदी’
पुणे : लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले… अनेकांनी आपले रोजगार गमावले… त्यामुळे अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. पैशांअभावी पालक आपल्या मुलांची लग्ने करु शकत नाहीत., ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळे पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गरजू कुटुंबातील मुला-मुलींची लग्न लावून देण्यात येणार आहेत.
निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ज्यांची लग्ने केवळ पैशांअभावी थांबली आहेत, अशा बेताची आर्थिक परिस्थिती असणा-या कुटुंबातील मुलांची लग्ने पुण्यामध्ये करुन देण्यात येणार आहेत. संस्थेचे पदाधिकारी डॉ. नवनीत मानधनी यांच्या संकल्पनेतून सर्व शासकीय नियम पाळून ही लग्ने करुन देण्यात येणार आहेत.
डॉ.नवनीत मानधनी म्हणाले, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पुण्याजवळील भूगावच्या तळ्याला लागून असलेल्या ‘सरोवर’ या रिसॉर्टमध्ये ही लग्ने होणार आहेत. हिंदू संस्कृतीप्रमाणे ही लग्ने होणार आहेत. लग्नस्थळाचा खर्च, गुरुजी, लग्नाच्या ठिकाणचे डेकोरेशन, पाहुण्यांचा जेवणाचा खर्च संस्था करणार आहे. यासोबतच भेटवस्तू देखील आहेर स्वरूपात देण्यात येणार आहे. लग्नात सहभागी होणा-या लोकांच्या कोरोना चाचणीचा खर्च देखील संस्था करणार आहे. लग्नामध्ये वर-वधू त्यांचे आईवडील आणि इतर ४ नातेवाईक सहभाग घेऊ शकणार आहेत.
संस्थेचे विराज तावरे म्हणाले, इच्छुकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसहित नावनोंदणी करावी. दिनांक १४ मे अक्षयतृतीया आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. दिनांक ९ मे ही नावनोंदणीची अंतिम तारीख आहे. तरी आर्थिक परिस्थिती बेताची असणा-या वधू-वरांच्या पालकांनी ९८५०२२४४४५, ८६०५११२३४५, ९१६८२८७८६९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
