कोरोना पार्श्वभूमीवर नियतकालिकांच्या वितरणाबाबत पोस्टाकडून निर्णयाची प्रतिक्षा
पुणे, दि. 6 – संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. महाराष्ट्रात मार्च 2021 पासून विविध प्रकारचे निर्बंध लावत लॉकडाऊन केले आहे. या पार्श्वभूमीवर नियतकालिकांची छपाई आणि वितरण करण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. गेल्या वर्षी संपूर्ण देशात लॉकडाऊन असतांना पोस्ट विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर 2020 पर्यंत नियतकालिकांना पोस्टींग करण्याबाबत सवलत दिलेली होती. आता पुन्हा तशीच परिस्थिती असून देखील पोस्टाकडून आवश्यक ती सवलत मिळत नाही तर उलटपक्षी ज्यांनी अंक पोस्ट केलेले नाहीत अशा प्रकाशकांंना पुढील अंक वाढीव दराने पोस्टींग करण्याच्या व दंड लागणार असल्याच्या नोटीसा पोस्टाकडून मिळत आहेत. अ. भा. मराठी नियतकालिक परिषदेने यासंदर्भात गेल्या एक महिन्यापासून दिल्ली येथील पोस्ट संचालक, महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल आणि पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल यांना निवेदने दिली आहेत, मात्र अद्याप त्यावर काहाही निर्णय मिळत नसल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस भालचंद्र कुलकर्णी, अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील यांनी आज येथे दिली.
कोरोनाची परिस्थिती वाढत असल्याने अनेक प्रिंटींग प्रेस बंद आहेत, कागद उपलब्ध होत नाहीत, बांधणी यंत्रणा बंद आहेत याचा विचार करता अनेक प्रकाशकांना अंक तयार करता येत नाहीत. त्यामुळे गेल्या महिन्यात एप्रिलचा अंक छापला गेला नाही आणि तशीच परिस्थिती याही महिन्यात आहे. सध्या पोस्टामध्ये अंक स्विकारला जात असला तरी अंकाचे वितरण पुढे होत नसल्याने अनेकांना अंक मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे वाचक, वर्गणीदार तसेच जाहिरातदार यांची अडचण झाली आहे.
पोस्टाच्या नियमांनुसार अंक छापला गेला नसल्यास त्यापुढील अंकाला सवलत मिळत नाही, जोडअंक काढण्यास वर्षातून एकदाच परवानगी मिळते, दिलेल्या तारखेसच अंकांचे पोस्टींग होणे आवश्यक असते, तारीख बदलून घेणे अशा अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना प्रकाशकांना सध्या करावा लागत आहे. पोस्टाने या नियमांना सध्याच्या कोरोना परिस्थितीत सवलत देवून सर्व व्यवहार सुरळीत झाल्यावर योग्य ते सहकार्य करण्याची गरज असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी देखील अशीच प्रकाशकांची परिस्थिती आहे. त्यामुळे पोस्ट खात्याने सर्वांसाठीच सुयोग्य निर्णय घ्यावा व नियतकालिकांच्या प्रकाशकांना दिलासा द्यावा.सद्यस्थितीत देशभरात सुमारे दीड लाख नियतकालिके रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स ऑफ इंडिया यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मराठीसह सर्व भाषेतील नोंदणीकृत असलेली सुमारे 20 हजार नियतकालिके आहेत, ज्यामध्ये सुमारे 2 हजार दैनिके व 18 हजार अन्य नियतकालिके नोंदणीकृत आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्रातून सुमारे 4 हजार आणि त्यापैकी सुमारे एक हजार मराठी नियतकालिके पुणे शहरातून प्रसिध्द होत आहेत, तर सुमारे 600 नियतकालिकांना पोस्टाचा सवलतीचा परवाना असल्याची माहिती यावेळी कुलकर्णी यांनी दिली.
सद्यस्थितीत देशभरात सुमारे दीड लाख नियतकालिके रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स ऑफ इंडिया यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मराठीसह सर्व भाषेतील नोंदणीकृत असलेली सुमारे 20 हजार नियतकालिके आहेत, ज्यामध्ये सुमारे 2 हजार दैनिके व 18 हजार अन्य नियतकालिके नोंदणीकृत आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्रातून सुमारे 4 हजार आणि त्यापैकी सुमारे एक हजार मराठी नियतकालिके पुणे शहरातून प्रसिध्द होत आहेत, तर सुमारे 600 नियतकालिकांना पोस्टाचा सवलतीचा परवाना असल्याची माहिती यावेळी कुलकर्णी यांनी दिली.
