विनोदामध्ये अहंकार, दुःख हरण्याचे सामर्थ्य : डॉ. रामचंद्र देखणे
पुणे : “हास्य ही विनोदाची अभिव्यक्ती, तर आनंद ही परिपूर्ती आहे. विनोदामध्ये अहंकार, दुःख हरण्याचे सामर्थ्य आहे. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी हास्याचे ‘टॉनिक’ आपण सर्वांनी जवळ बाळगले पाहिजे. त्यासाठी आपल्यातील विनोदबुद्धी जागृत ठेवायला हवी,” असे प्रतिपादन संत साहित्य व लोकवाङ्मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले.
नवचैतन्य हास्ययोग परिवाराने ऑनलाईन जागतिक हास्ययोग दिवस (दि. २ मे) उत्साहात साजरा केला. पुण्यासह देश-परदेशातून ४००० पेक्षा अधिक लोकांनी ऑनलाईन हास्ययोग केला. ‘हास्य, आनंद आणि तत्वज्ञान’ या विषयावर डॉ. रामचंद्र देखणे यांचे उद्बोधन झाले. फेसबुक व युट्युबवर हा ऑनलाईन सोहळा हजारो लोकांनी लाईव्ह पाहिला. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे सर, सुमनताई काटे, मकरंद टिल्लू, पी. के. सिंघवी, विजय भोसले, प्रमोद ढेपे आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक यांनी मनोगते व्यक्त करत शुभेच्छा संदेश दिले.
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “हसत राहा आणि इतरांना हसवत राहा, हे आनंदी जीवनाचे तत्वज्ञान आहे. संत परंपरेतही विनोदाला महत्वाचे स्थान आहे. भारूड किंवा अन्य प्रकारातून आपल्याला त्याची अनुभूती येते. विद्येला जेवढे महत्व आहे, तेवढेच महत्व विनोदाला असल्याचे साहित्यात दिसून येते. श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे अशा अनेक महान साहित्यिकांनी विनोदाची परंपरा तत्त्वज्ञानाच्या अंगाने अधोरेखित केली. निखळ हास्य पेरणाऱ्या विनोदी साहित्याची आणि विनोद समजून घेणाऱ्यांची आज वानवा दिसते. व्यंग्यचित्रांतून हास्यविनोद होत असतो. मात्र, साहित्यात व्यंग्यचित्रकाराला फारसे महत्व दिले जात नाही.”
“आज कोरोनाच्या या परिस्थितीत आपल्या भवताली अनेक आप्तेष्ट, जवळच्या व्यक्ती गमावल्याने आपल्यावर दुःख कोसळत आहे. अशावेळी आनंदाचे दोन क्षण जगत पुन्हा सकारात्मक होण्यासाठी विनोदाचे तत्वज्ञान उपयोगी पडणार आहे. कोरोनाने मावळलेले हास्य पुन्हा प्रफुल्लित करण्यासाठी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा हा उपक्रम महत्वाचा आहे. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांना, कुटुंबपद्धतीला आदराचे स्थान आहे. हास्ययोगाने ज्येष्ठांना या कठीण काळातही चैतन्यमय राहण्यास मदत होत आहे.”
विठ्ठल काटे म्हणाले, “कोरोनामुळे ज्येष्ठांचा व्यायाम बंद झाला. परिणामी, शारीरिक व्याधी, मानसिक दुर्बलता उद्भवू लागल्या. तेव्हा नवचैतन्य हास्ययोग परिवाराने ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन हास्ययोग वर्ग भरवला. ज्येष्ठ नागरिकांचा घरबसल्या व्यायाम चालू झाला. हजारो ज्येष्ठांचे शरीर-मनाचे स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत झाली. नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालत ऑनलाईन योग-प्राणायाम आणि हास्ययोग वर्ग सुरु झाले. आज जवळपास १००० कुटुंबातील २००० लोक रोज ऑनलाईन योग आणि हास्ययोग करत आहेत.”
हास्ययोग प्रशिक्षक मकरंद टिल्लू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पी. के. सिंघवी यांनी प्रास्ताविक केले. विजय भोसले यांनी आभार मानले.
