fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

मोहन धारिया यांचे जीवन त्याग, समर्पणाचे प्रतीक : प्रा. डॉ. संजय चोरडिया

पुणे : “भारताचे माजी केंद्रीय मंत्री व ‘वनराई’चे संस्थापक पद्मविभूषण मोहन धारिया यांचे जीवन त्याग, समर्पण व नि:स्वार्थ भावनेचे प्रतीक आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी समाजासाठी, पर्यावरणासाठी केलेले कार्य आदर्शवत आहे. अशा व्यक्तीला २५०० व्या भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने २५ एप्रिल २०२१ रोजी पहिला मरणोत्तर अहिंसारत्न पुरस्कार प्रदान करताना मन भरून आले आहे,” अशी भावना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष  प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केली.
भगवान महावीर जयंती दिवशी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे मोहन धारिया यांना पहिला ‘अहिंसारत्न विश्व पुरस्कार-२०२१’ (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला. ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ‘सूर्यदत्ता’चे कार्यकारी संचालक प्रा. अक्षित कुशल, धारिया परिवारातील माधवी धारिया, सागर धारिया, निनादा कश्यप, रश्मी धारिया आदी उपस्थित होते. ज्यांनी महावीरांची जीवनशैली आचरणात आणत समाजात अहिंसा, सत्य, निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या सेवावृत्तीना महावीर जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी अहिंसारत्न पुरस्कार दिला जाणार असल्याचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “मोहन धारिया यांच्या जीवनाचा आढावा घेतला, तर भगवान महावीर यांनी दिलेली अहिंसा, सत्य, अपरिग्रहाची शिकवण अण्णांनी आचरणात आणली. महावीरांच्या शिकवणी व मूल्यांचा आदर त्यांच्या विचारधारेत, जीवनात दिसतो. सर्व जगाला आदर्श ठरेल, अशीच त्यांची जीवनशैली होती. गावागावात पर्यावरण संवर्धनाची चळवळ नेली. शेतकरी, गावकरी यांच्याकडून त्यांना मोलाची साथ मिळाली. राजकारण, समाजकारण आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी होते. अण्णांप्रमाणेच सर्वानी महावीरांची जीवनमूल्ये आचरणात आणली, तर जग शांततेच्या, समानतेच्या मार्गावर जाईल. सदृढ, निरोगी व आनंददायी होईल.”
“माझी आई रतनबाई व वडील बन्सीलाल चोरडिया या दोघांनीही आयुष्यभर जैन धर्माचे, मूल्यांचे व आचार-विचारांचे काटेकोरपणे अखंडित पालन केले. वडील बन्सीलाल यांनी नाना पेठेतील साधना सदनात हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी मूल्यांची शिकवण देत मूल्याधारित जीवन जगण्याची प्रेरणा दिली. यासाठी अनेक गोष्टींचा त्यांनी त्याग केला. पादत्राण न घालणे, दोन वेळेसच भोजन घेणे, अन्न वाया न घालवणे, पहाटे लवकर उठणे, वारकरी-संथारा करणाऱ्यांची सेवा करणे आदी गोष्टी ते नियमित करत. त्यांच्या या व्रतात आई रतनबाई यांची मोलाची साथ होती. परिवाराची सर्व जबाबदारी सांभाळत त्यांनी वडिलांना साथ दिली,” असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
रवींद्र धारिया म्हणाले, “भगवान महावीरांच्या नावाने दिला जाणारा हा पहिला पुरस्कार माझे वडील मोहन धारिया यांना प्रदान केला, याबद्दल सूर्यदत्ता परिवाराचे आभार मानतो. महावीरांनी दिलेल्या शिकवणी प्रत्यक्ष जगात अण्णांनी कार्य उभारले. तेच कार्य आणखी जोमाने पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत.”
‘बन्सीरत्न इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेरियन क्यूलिनरी आर्टस् अँड रिसर्च’ची स्थापना  
आई-वडिलांच्या प्रेरणेतूनच २२ वर्षांपूर्वी सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना झाली. त्यांच्या विचार-आचारांच्या स्मृती जागवत आजच्या काळाची गरज ओळखून सर्व शाकाहारी विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन शाश्वत व्यवसाय किंवा रोजगार उभारता यावा, यासाठी ‘सूर्यदत्ता’च्या वतीने महावीर जयंती निमित्ताने ‘बन्सीरत्न इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेरियन क्यूलिनरी आर्टस् अँड रिसर्च’ची स्थापना करण्यात येत आहे. लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंगच्या सहकार्याने जगातील संपूर्ण शाकाहारी पदार्थांचा अभ्यास करून त्याचा अभ्यासक्रम लवकरच तयार केला जाणार आहे. ही इन्स्टिट्यूट देशातील काही मोजक्या व्हेजिटेरियन इन्स्टिट्यूटपैकी एक असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading