fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRATOP NEWS

४५ मेट्रिक टन द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनच्या ३ टँकरसह ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ कळंबोलीमध्ये दाखल

अलिबाग, दि.२६ – राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे.

या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ४५ मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या ३ टँकरसह ही “ऑक्सिजन एक्सप्रेस” कळंबोली येथे दाखल झाली.

विशाखापट्टणम् येथून वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन आणण्याकरिता पनवेल मधील कळंबोली येथून 10 ट्रकची “ऑक्सिजन एक्स्प्रेस” परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१९ एप्रिल २०२१ रोजी रवाना करण्यात आली होती. आज ही “ऑक्सिजन एक्सप्रेस” कळंबोलीमध्ये दाखल झाल्यामुळे कोविड रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काल सायंकाळी ६.०० वाजता जामनगर येथून निघालेली ही एक्सप्रेस आज सकाळी ११.३० च्या सुमारास कळंबोली रेल्वे स्थानकात दाखल झाली.

जामनगर येथून निघालेल्या या “ऑक्सिजन एक्सप्रेस” मधील 10 टँकरपैकी 3 टँकर हे नागपूर येथे, ४ टँकर हे नाशिक येथे आणि उर्वरित ३ टँकर हे कळंबोली, पनवेल येथे उतरविण्यात आले.

नाशिक येथे उतरविण्यात आलेल्या टँकरमधील वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन नाशिकसह, अहमदनगर आणि इतर परिसरातील गरजू रुग्णांना पुरविण्यात येणार आहे. तर कळंबोली येथे आलेले टँकर्स रिलायन्स जामनगर येथून आलेले आहेत. प्रत्येकी १५ मेट्रिक टन असे एकूण ४५ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे हे टँकर्स उच्चस्तरीय समितीमार्फत रवाना करण्यात येत असून अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील २ टँकर हे मुंबईसाठी तर १ टँकर पुण्यासाठी रवाना करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये पाठविण्यात येणाऱ्या टँकरपैकी एक टँकर सेव्हन हिल रुग्णालयासाठी तर दुसरा रबाळे,नवी मुंबईसाठी पाठविण्याचे नियोजन आहे. हे टँकर परिवहन विभागाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांच्या देखरेखीखाली परिवहन विभागामार्फत सुरक्षितरित्या रवाना करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शशिकांत तिरसे यांनी दिली आहे.

ही “ऑक्सिजन एक्सप्रेस” कळंबोली येथे आणणे व मेडिकल लिक्विड ऑक्सिजन टँकर्सचे नियोजन  करण्यासाठी प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसिलदार विजय तळेकर, कळंबोली स्टेशन मास्तर डी.बी.मीना, एरिया मॅनेजर श्री.राजेश कुमार, कळंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शशिकांत तिरसे आदींनी समन्वय साधला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading