Wednesday, June 17, 2026
PUNE

पुणेकर त्रस्त खासदार मस्त, महापालिका प्रशासन व भाजपवर रमेश बागवे यांची टीका

पुणे –  शहरात कोरोना संसर्गामुळे दररोज ६० ते ७० रूग्णांचा मृत्यू होत आहे. जवळपास १२०० रूग्ण गंभीर अवस्थेत आहेत. असे असतानाच पुणे महापालिकेचे १०० ऑक्सिजन व ४०० आयसोलेशन बेडचे साहित्य खराडीतील कै. विठोबा मारूती पठारे क्रीडा संकुलात धुळ खात पडले आहे ही अतिशय गंभीर बाब आहे. खासदार गिरीष बापट यांना शोधण्याची वेळ आलेली आहे. पुणेकर नागरिक त्रस्त असताना खासदार पुणेकरांच्या मदतीला आले नाही. खासदार म्हणून जी जबाबदारी पार पाडायची ती पाडण्यास ते अपयशी ठरले आहेत. अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.

पठारे क्रीडा संकुल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या मतदार संघात आहे. सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष असून सुध्दा त्यांच्या मतदार संघात अशा प्रकारचा भोंगळा कारभार होत आहे ही शोकांतिका आहे. रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना वनवन फिरावे लागत आहे. अनेक रूग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावा लागत आहे परंतु पुणे महानगरपालिकेचे प्रशासन व सत्ताधारी भारतीय जनता पक्ष परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहे. त्या क्रीडा संकुलात भवन रचनेचे दुरूस्तीचे काम चालू आहे. महापालिकेच्या आरोग्य खात्याने अजूनही क्रीडा संकुल ताब्यात घेतले नाही. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे शिष्ट मंडळ वेळोवेळी भेटून निवेदन देऊन पुण्यातील परिस्थितीच्या बाबतीत आणि संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याची माहिती दिली परंतु आयुक्त कोणतेही ठोस पाऊल घेत नसल्याचे दिसून येत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे फक्त आश्वासन देत आहेत परंतु वस्तूस्थिती पाहता त्यांच्याकडून काहीही काम होत नाही. महापालिकेतील सभागृहनेते, भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या साथीत गरजू रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयातील सेवा सुविधा वाढविण्यात येत आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात दळवी हॉस्पिटलच्या इमारतीतील जागेनुसार बेडही वाढविणे शक्य होईल परंतु तयार असलेल्या कै. विठोबा मारूती पठारे क्रीडा संकुलात रूग्णांना उपचार देण्यासाठी त्यांनी आजपर्यंत कोणतेही तयारी केली नाही. खासदार गिरीष बापट यांना शोधण्याची वेळ आलेली आहे. पुणेकर नागरिक त्रस्त असताना खासदार पुणेकरांच्या मदतीला आले नाही. खासदार म्हणून जी जबाबदारी पार पाडायची ती पाडण्यास ते अपयशी ठरले आहेत. रूग्णांना दवाखान्यामध्ये बेड मिळत नाही, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. गंभीर रूग्णांना उपचारासाठी व्‍हेंटिलेटर मिळत नाही, रेमडेसिविर व टोसिलीजुमॅब इंजेक्शन मिळविण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी हेलपाटा मारावा लागत आहे. खासदार गिरीष बापट यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून पुण्याला पुरेसे व्‍हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधे मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फक्त घोषणा केली की, पुण्याला केंद्राकडून जास्तीत जास्त व्‍हेंटिलेटर पुरविण्याची व्‍यवस्था करणार पण ते ही फक्त कागदावरच दिसत आहे. १ मंत्री, १ खासदार, ५ आमदार व १०० नगरसेवक असून सुध्दा भारतीय जनता पक्षाने आज पुणेकर नागरिकांना या गंभीर परिस्थितीत वाऱ्यावर सोडले आहे व त्यांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत. केवळ जाहिरातबाजी करून नागरिकांची दिशाभुल करण्यास सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मग्न आहे. प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी जर योग्य पाऊल उचलले नाही तर पुढे त्यांना पुणेकर नागरिकांचा रोष पत्कारावा लागेल. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading