Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही

 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे  : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये बंद होण्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कोणत्याही परिस्थितीत पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही.” त्यामुळे या संदर्भातील सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

रेल्वे विभागाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि नव्या रेल्वे सेवांच्या लोकार्पणासाठी अश्विनी वैष्णव पुणे दौऱ्यावर आले असता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेत मोहोळ यांनी पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाबाबत निर्माण झालेल्या चिंतेची माहिती दिली आणि हा विभाग कायम ठेवण्याची मागणी केली. त्यावर अश्विनी वैष्णव यांनी अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव अथवा विचार केंद्र सरकारसमोर नसल्याचे स्पष्ट केले.

पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाला अनेक दशकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, जिलहा तसेच विविध भागांतील लाखो श्रोत्यांचे आकाशवाणीशी भावनिक नाते जुळलेले आहे. स्थानिक घडामोडी, सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विश्वसनीय बातम्यांचे माध्यम म्हणून आकाशवाणीने दीर्घकाळ लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे वृत्त विभाग कायम ठेवण्याची जनभावना मोहोळ यांनी मंत्री वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवली.

यावेळी स्पष्टीकरण देताना अश्विनी वैष्णव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील आकाशवाणी केंद्रांचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्याचे काम सुरू आहे. आकाशवाणी अधिक प्रभावी, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही विविध स्तरांवर प्रयत्न करत आहोत. त्यामुळे पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट स्थानिक बातम्या आणि जनसंपर्क अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे. महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व आकाशवाणी केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.”

याबाबत प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे आकाशवाणी केंद्राला गौरवशाली इतिहास लाभला आहे. आजही जवळपास सव्वा कोटी श्रोते नियमितपणे आकाशवाणीवरील बातम्यांवर विश्वास ठेवतात. प्रत्येक श्रोत्याच्या मनातील भावना आणि अपेक्षा मी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहील, अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. त्यामुळे वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळायला हवा. आकाशवाणीचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकार घेत असलेल्या पुढाकाराबद्दल मी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

पुणे आकाशवाणी ही केवळ एक प्रसारण संस्था नसून पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तिचे जतन, संवर्धन आणि आधुनिकीकरण करून अधिक सक्षम स्वरूपात पुढे नेण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading