fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRATOP NEWS

परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे – राज ठाकरे

मुंबई – राज्यात कोरोना संकट गडद होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा सुसंवाद होताना दिसून येत आहे. लागोपाठ दोन दिवस हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलले. एकदा फोनवरून आणि एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात संवाद झाला. यावेळी नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. ‘काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि लॉकडाऊनसंदर्भात भेटण्याची विनंती केली होती पण त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे तेदेखील क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे झूमवर बोलता येईल, असे सांगितले. आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झाले आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आले नसते. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे’, असे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले. तसेच महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरच्या राज्यातून येणारे लोक जबाबदार असल्याचे सांगताना पश्चिम बंगाल वैगरे इतर राज्यांमध्ये लाटा येत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

‘परप्रांतीय जात असताना त्यांची मोजणी आणि चाचणी करण्यासंबंधी मी सूचना केली होती पण असल्या कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. येत असलेली माणसं मोजलीही नाहीत. त्यामुळे कोण येतंय, कोण जातंय याचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज कोरोना आहे उद्या दुसरं काही असेल. हे दुष्टचक्र थांबणार नाही. आपण बंधन घालत नाही आहोत. हे चित्र चांगलं नाही. त्यामध्ये सर्वांची वाताहत होत आहे’, अशी टीका राज ठाकरेंनी केली. तसेच ‘शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केलं पाहिजे. खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी. विशेष गर्दी न होता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी. या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा’, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या असल्याची माहितीही राज ठाकरेंनी यावेळी दिली.

तसेच ‘अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असूनदेखील कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवे. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत’, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर ‘राज्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत आहे. हे महाराष्ट्रातच का दिसत आहे यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. खऱ्या गोष्टी लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे ऐकिवात नाहीत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारे लोक आहेत आणि त्या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे येत नाहीत’, असे राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading