fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

STPI MOTION व पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

पुणे, दि. ६ - शहरी गतिशीलता कार्यक्षेत्रातील आव्हानांचे निराकरण करण्यासाठी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस ऑफ इंडिया (STPI), "MOTION" व पीएमपीएमएल यांच्यात सामंजस्य करार झाला. STPI चे महासंचालक तथा STPINEXT चे अध्यक्ष डॉ. ओंकार राय यांच्या प्रमुख उपस्थितीत पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप आणि STPI चे महाराष्ट्र व गोवा राज्याचे संचालक संजय कुमार गुप्ता यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

सदरचा कार्यक्रम भोसरी एमआयडीसी, पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स सदन- ३ मधील "MOTION" च्या कार्यालयात शनिवार दि. ३ एप्रिल २०२१ रोजी पार पडला. ऑटोनॉमस कनेक्टेड इलेक्ट्रिक शेअर्ड (ACES) मोबिलिटीसाठी STPI चे MOTION हे एक उत्कृष्ट दर्जाचे केंद्र आहे. MOTION ही पुणे शहरातील ACES कार्यक्षेत्रातील एक अत्याधुनिक सुविधा केंद्र आहे. तंत्रज्ञान, जागतिक दर्जाच्या लॅब, मार्गदर्शक, निधी, विपणन सहाय्य आणि अशा अनेक सुविधा पुरवून भारताला तंत्रज्ञानाच्या नेतृत्वात अग्रगण्य स्थानावर पोहोचविण्यासाठी आणखी बळकट करणे, असा उद्देश MOTION केंद्राचा आहे. मार्गदर्शन करणे व तंत्रज्ञानामध्ये सहाय्य करणे या व्यतिरिक्त MOTION हे केंद्र OEM, उद्योग संघटना, मार्गदर्शक, कार्यक्षेत्र तज्ञ, गुंतवणूकदार आणि Go To Market चे समर्थन करणारे एक व्यासपीठ असलेल्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास मदत करते. पीएमपीएमएल ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील प्रमुख सार्वजनिक परिवहन प्राधिकरण आहे. पीएमपीएमएल ही संस्था प्रवाशांना सुरक्षित, स्वस्त, कार्यक्षम, विश्वसनीय, सहज उपलब्ध होणारी, परिवर्तनशील अशी प्रवाशी सेवा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. तसेच पीएमपीएमएलने प्रदूषण विरहीत प्रवासी सेवा देऊन शाश्वत विकासाला चालना देण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

MOTION व पीएमपीएमएल मध्ये झालेल्या सामंजस्य कारारावेळी बोलताना डॉ. ओंकार राय म्हणाले, ही भागीदारी शहरी गतिशीलता कार्यक्षेत्रामधील वास्तविक आव्हाने सोडविण्यासाठी कार्यरत स्टार्ट अप्सना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देईल. ते पुढे म्हणाले की, MOTION हे त्यांच्या विकासासाठी ACES स्टार्ट अप मधील एक उत्कृष्ट केंद्र म्हणून विकसित होण्यास तयार आहे. डॉ. राय यांनी या उपक्रमात सहकार्य मिळाल्याबद्दल महाराष्ट्र सरकार, टाटा मोटर्स, कायनेटिक, ARAI, Intel, Visteon, MathWorks, SAE India, TiE आणि पुणे इंजिनिअरिंग कॉलेज या सर्व भागीदारांचे आभार मानले.

याप्रसंगी बोलताना डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, पीएमपीएमएल ने शहरातील कार्यकारी क्षमता सुधारण्यासाठी तसेच शहरातील रहिवाशांना अधिक सुविधा मिळावी यासाठी पुढाकार घेऊन अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरी गतिशीलता आणि इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात नवीन उपक्रम राबविण्यासाठी डेटा आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पीएमपीएमएल ची प्रगती साधणे यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. STPI-MOTION बरोबर पीएमपीएमएल ची झालेली ही भागीदारी त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading