वाचनसंस्कृती प्रसारार्थ
‘जागतिक बाल पुस्तक दिनानिमित्त’ ग्रंथभेट

पुणे, दि. 1 – ‘जागतिक बाल पुस्तक दिनाचे’ औचित्य साधत ‘घरोघरी असावी ग्रंथसंपदा’ उपक्रमाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातील शिक्षण संस्था, वस्ती, सोसायटी येथील मुलांना, शिक्षक व पालकांना मराठी, इंग्रजी भाषेतील परीकथा, मनोरंजनात्मक गोष्टी तसेच संस्कार व बोधपर अशा सातशे गोष्टींच्या पुस्तकांचे कोविडच्या नियमांचे पालन करत वाटप करण्यात आले. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी उपक्रमाचे आयोजन केले.

जगातील पहिला परिकथाक हँन्स ख्रिस्तीयन अँडरसन याच्या जन्मदिनानिमित्त जगभरात 2 एप्रिल हा दिवस ‘बाल पुस्तक दिन’ म्हणून साजरा होतो. त्या निमित्ताने कर्वेनगर परिसरातील अभिजात एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात संपन्न पुस्तक भेट कार्यक्रम प्रसंगी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे, मुख्याध्यापिका पूर्वा म्हाळगी, पर्यवेक्षिका मंजिरी जाधव, सुनिल वाटवे, मानसी कुलकर्णी आदि उपस्थित होते. अभिजात शाळेसोबतच, अत्रे प्रशाला, वंचित विकास, स्वरुपवर्धिनी, अशा अन्य संस्था, शाखा तसेच भीमनगर वस्ती परिसरातील मुले व त्यांचे पालकांना गोष्टींच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना भडसावळे म्हणाले, “कोविड काळात शाळा नाही, खेळ नाही. आँनलाईन शिक्षण यात अडकलेली मुले, त्यांचे कुटुंबिय पाहता मुलांना वाचनासाठी प्रेरित करण्यास हाच काळ योग्य असल्याची जाणीव झाल्याने ‘घरोघरी असावी ग्रंथसंपदा’ उपक्रमास प्रारंभ केला. यात मुलांना आवडतील अशी ज्ञान व मनोरंजनात्मक पुस्तके भेट देण्यात येतात. गेल्या सहा महिन्यांत पाच हजार मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.’ उपक्रमासाठी अभिनेते डॉ. गिरीष ओक, गायिका जयश्री रानडे, ग्रंथप्रेमी सनदी लेखापाल सुरेश रानडे, स्वा. सावरकर अभ्यासक सु. ह. जोशी, साहित्यिक भारत सासणे, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुस्तके भेट दिली आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: