नाट्यगीत गायन स्पर्धेत गायत्री कुलकर्णी, संजय धुपकर प्रथम

पुणे : स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणेतर्फे हौशी कलाकारांसाठी आयोजित केलेल्या ज्येष्ठ ऑर्गनवादक कै. चंद्रशेखर हरिभाऊ देशपांडे स्मृती ऑनलाईन नाट्यगीत गायन स्पर्धेत 18 ते 40 या वयोगटात सांगलीची गायत्री कुलकर्णी तर 40 वर्षांवरील खुल्या गटात पुण्याचे संजय धुपकर हे कै. हरिभाऊ नारायण देशपांडे प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले.

ऑनलाईन नाट्यगीत गायन स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून 18 ते 40 या वयोगटात 34 तर 40 वर्षांवरील खुल्या गटात 23 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष आहे. स्वरराज छोटा गंधर्व यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 2018मध्ये प्रतिष्ठानची पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. जुनी संगीत नाटके उभरत्या कलाकारांच्या साथीने पुन्हा मंचस्थ करून रसिकांना पुन:प्रत्ययाचा आनंद देणे आणि मराठी संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमातील पुढचे पाऊल म्हणून प्रतिष्ठानतर्फे हौशी कलाकारांसाठी या वर्षीपासून नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चारूशीला केळकर यांनी दिली. दोन्ही गटातील प्रथम क्रमांकासाठी 3000/-, द्वितीय क्रमांकासाठी 2000/-, तृतीय क्रमांकासाठी 1000/- रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी 500/- रुपये तसेच प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, असे प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सुचेता अवचट यांनी सांगितले. स्पर्धेचे परिक्षण ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय गोगटे आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते रवींद्र कुलकर्णी यांनी केले.

स्पर्धेविषयी बोलताना रवींद्र कुलकर्णी म्हणाले, स्पर्धेतील युवा पिढीचा सहभाग, त्यांनी केलेले सादरीकरण कौतुकास्पद आहे. नाट्यगीताचे सादरीकरण अधिक प्रभावीपणे होण्यासाठी नाटकांच्या संहितांचे वाचन झाले पाहिजे, भूमिकेचा अभ्यास झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गाण्यामधील जागा दाखविताना नाट्यगीत सादरीकरणात वैविध्य दिसणे आवश्यक आहे, असे सांगून नाट्यगीत गाताना ते शास्त्रीय संगीताच्या अंगाने गाणे योग्य नाही, अशी सूचना संजय गोगटे यांनी केली. विजयी स्पर्धकांचे श्रीकांत दंडवते यांनी अभिनंदन केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल
वयोगट : 18 ते 40 : प्रथम : गायत्री कुलकर्णी (सांगली), द्वितीय : स्वानंद देशमुख (जळगाव), तृतीय : मिताली वाळिंबे (पुणे), उत्तेजनार्थ : अद्वैत मराठे (पुणे), निहाल खांबेटे (दापोली).
वयोगट 40 वर्षांवरील खुला : प्रथम : संजय धुपकर (पुणे), द्वितीय : रवींद्र मधुसूदन कुलकर्णी (पुणे), तृतीय : ज्योती फाटक (पुणे), उत्तेजानार्थ : डॉ. प्रीती गोखले (पुणे), मनोहर सोनावणे (पुणे).

Leave a Reply

%d bloggers like this: