जागतिक रंगभूमीदिनी उलगडला मराठी रंगभूमीचा इतिहास

पुणे : जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नांदी, नाट्यपदे, निवडक नाटकातील प्रवेशांद्वारे मराठी रंगभूमीच्या समग्र इतिहासाची झलक दाखविण्यात आली.

नाट्यसंस्कार कला अकादमी आणि राष्ट्र सेवा दल सांस्कृतिक विभागातर्फे या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन बॅ. नाथ पै सभागृहात करण्यात आले होते. नाट्यसंस्कार कला अकादमीच्या बाल कलाकारांपासून ज्येष्ठ कलाकार यात सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘पंचतुंड नररूंड मालधर’ आणि ‘नमन नटवरा विस्मयकारा’ याद्वारे झाली. प्रकाश पारखी (सूत्रधार) आणि दिपाली निरगुडकर (नटी) यांनी मराठी रंगभूमीचा अलौकिक वारसा कथन केला. या निमित्ताने प्राचीन रंगभूमीपासून संस्कृत, संगीत, ऐतिहासिक, सामाजिक नाटकांचा अनुबंध कलाकारांनी सादरीकरणातून उलगडून दाखविला.
संगीत शारदा, संगीत सौभद्र, मीरा-मधुरा नाटकातील निवडक प्रवेशांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. पु. ल. देशपांडे लिखित ‘तुज आहे तुजपाशी’मधील ‘अति विशाल महिला मंडळ’ हा प्रवेशही सादर करण्यात आला. भास, कालिदास, राम गणेश गडकरी, प्र. के. अत्रे, वसंत कानेटकर, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी यांच्या सिद्धहस्त लेखणीचा गौरव करून या विभुतींचे स्मरण करण्यात आले.
संध्या कुलकर्णी, वैशाली गोस्वामी, हर्षदा ताम्हाणे आणि सहकार्‍यांनी नाट्यप्रवेश सादर केले. पूजा पारखी, हर्षदा ताम्हाणे, गंधाली अरगडे आणि प्रकाश पारखी यांनी नांदी सादर केली.

Leave a Reply

%d bloggers like this: