भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त पुण्‍याच्‍या आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रा

पुणे, दि. 12- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ येथील आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रेने (हेरिटेज वॉक )करण्‍यात आला. हरियाणा सरकारच्‍या आर्थिक आयोगाचे सल्‍लागार मदन मोहन गोयल, आमदार चंद्रकांत पाटील, भारतीय पुरातत्‍व विभागाचे राजेंद्र यादव, राजेश पांडे, नेहरु युवा केंद्राचे यशवंत मानखेडकर, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, माजी आमदार जगदीश मुळीक, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, नीलम महाजन आदी उपस्थित होते.

भारतीय पुरातत्‍व विभाग, सांस्‍कृतिक मंत्रालय, नेहरु युवा केंद्र, राष्‍ट्रीय सेवा योजना, जिल्‍हाधिकारी कार्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ पदयात्रेचे आयोजन करण्‍यात आले होते. पदयात्रा आगाखान पॅलेस, शांतीनगर चौक, एअरपोर्ट रोड (अंडरग्राऊंड ब्रीज), मोरिगा शॉपी, हयात हॉटेल, नगर रोड, आगाखान पॅलेस या मार्गावरुन काढण्‍यात आली. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्‍यात आले होते. प्रारंभी नेहरु युवा केंद्राचे जिल्‍हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी प्रास्‍ताविक केले. हरियाणा सरकारच्‍या आर्थिक आयोगाचे सल्‍लागार मदन मोहन गोयल यांनी देशाला राजकीय स्‍वातंत्र्य मिळाले तथापि, प्रत्‍येकाला आर्थिक स्‍वातंत्र्य मिळण्‍याची गरज प्रतिपादन केली. स्‍वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शहिदांना त्‍यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनीही सर्वांना शुभेच्‍छा देवून भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्‍याचे आवाहन केले. पदयात्रेत राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: