Saturday, May 30, 2026
PUNE

जंगलाशी लागला लळा ,अन भीती निघून गेली ! : ‘ वन ‘ रागिणींचा अनुभव          

पुणे –किर्रर्र झाडी ,दुर्गम भाग ,वन्य प्राण्यांचा वावर आणि वणव्यांपासून कोणतीही येणारी संकटे अशा पार्श्वभूमीवर कार्यरत वन रागिणींनी आपल्या थरारक अनुभवांना वाट करून दिली आणि वन रागिणींच्या आव्हानात्मक आयुष्याची ओळख सर्वाना झाली . निमित्त होते ‘तेर पॉलिसी सेंटर ‘ आयोजित महिला दिनानिमित्त  संवाद ‘ वन  रागिणींशी’ या कार्यक्रमाचे !

गोंदिया कृषी विभागाच्या सहायक संचालक   प्रणाली चव्हाण, गीता बेलपत्रे (फायर फ्री फॉरेस्ट मिशन ,मेळघाट टायगर रिझर्व्ह ), स्मृती उपाध्याय(फॉरेस्ट गार्ड, बांधवगड टायगर  रिझर्व्ह ), राणी  गरुड (मेळघाट टायगर रिझर्व्ह ), लक्ष्मी मेरावी(कान्हा टायगर रिझर्व्ह ),प्रिया वरेकर (वाईल्ड लाईफ रिसर्चर ,कान्हा टायगर रिझर्व्ह ) हिर्मेलीन बेयपी ,( सामाजिक कार्यकर्ती ,करबी असाम) या महिला वन विभाग कर्मचारी तसेच संशोधक  या संवाद कार्यक्रमात सहभागी झाल्या  .

  ८ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता  ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला .महिला वन विभाग कर्मचाऱ्यांचा आव्हानात्मक आणि प्रेरणात्मक प्रवास या संवाद कार्यक्रमातून ऐकायला मिळाला  .    

 ‘तेर पॉलिसी सेंटर ‘ चे प्रकल्प समन्वयक सचिन अनपट यांनी त्यांच्याशी संवाद साधला .  ‘ तेर पॉलिसी सेंटर ‘ च्या संचालक डॉ. विनीता आपटे प्रास्ताविकात म्हणाल्या ,’ वन क्षेत्रातील आव्हाने स्वीकारणारया महिला दुर्लक्षित असतात. आज सर्व क्षेत्रात महिलानी भरारी मारली आहे पण वन क्षेत्रात महिला काम करतात तेही व्याघ्र अभयारण्यात तरुण मुली उत्तम कामगिरी बजावतात हे लोकाना माहिती नाही.  अशा सर्व वाघिणींचा आज गौरव व्हावा असे वाटते. त्यांचे अनुभव चित्त थरारक आहेत. 
 
गोंदिया येथील प्रणाली चव्हाण म्हणाल्या ,’ अजूनही दहावी पर्यंत शिक्षण झाल्यावर लग्न करून देण्याचा घाट घातला जातो . मुलींना जन्मापासून संघर्ष करावा लागतो . वन सेवेत दाखल झाल्यावर नक्षलवादी सीमांवर देखील काम करावे लागले . मी दुसऱ्या बाजूला पुढील शिक्षण घेत होते . शेती खात्यात सेवा सुरु केल्यावर या सर्व अनुभवांचा उपयोग होत आहे . 

‘जंगलात कधीही वन्य प्राणी समोर येऊ शकतात ,अशा वेळी डोळे ,नाक ,कान उघडे ठेवून काम करावे लागते असे बांधवगड अभयारण्यात कार्यरत स्मृती उपाध्याय यांनी सांगितले .हे काम करताना आपल्याला भीती न वाटता प्रेम वाटू लागते . खड्ड्यात पडलेल्या प्राण्यांना वाचविणे देखील आव्हानात्मक असते . बछड्याना प्रेमाने दूध पाजणारी ,खेळणारी वाघीण पाहण्याचे भाग्यही मला मिळाले.
गीता बेलपात्रे म्हणाल्या ,’मेळघाट मध्ये जल संधारणाचे काम आम्ही करीत आहोत . वणवे लागू नये याची जागृती आम्ही करीत आहोत . ३०० गावात कार्यरत आहोत . त्यासाठी स्पर्धा ,जनजागृती असे अनेक उपक्रम सुरु आहेत .  

कान्हा राष्ट्रीय अभयारण्यात फॉरेस्ट गार्ड म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मी मेरावी म्हणाल्या ,’ २००५ पासून वन खात्यात काम सुरु केले . लहानपणापासून जंगलाशी जिव्हाळा होता . तरीही वन्य प्राण्यांबद्दल सुरुवातीला भीती वाटत होती . ती हळहळू निघून गेली . रानकुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचले ,हा अविस्मरणीय क्षण होता . 

राणी गरुड म्हणाल्या  ,’ स्थानिक लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधणे हे खरे कौशल्य आहे . त्यांच्या अडचणी समजावून घेतले तर आपले वन संरक्षणाचे काम यशस्वी होते . गस्त घालताना सोबत हत्यारे असतात असेही नाही .रात्री अपरात्री लागणाऱ्या आगी नियंत्रित करणे हेही आव्हानात्मक असते . 

कान्हा अभयारण्यात कार्यरत असलेल्या संशोधक प्रिया वारेकर म्हणाल्या ,’नेहमीप्रमाणे ११ ते ५ कामाच्या चाकोरीत मला रस नव्हता . संशोधन ही वाट आवडीची होती .पण ,दुर्गम भागात राहून संशोधन करणे हे सोपे नसते . इथल्या हिंदी भाषेत छत्तीसगडी भाषेचे मिश्रण आहे ,ते समजणे अवघड असते . साप ,वाघ वाचविणे हे ध्येय ठेवून आम्ही काम करीत असतो . पालकांचे सहकार्य या क्षेत्रात महत्वपुर्ण ठरले.   महिला म्हणून काम करणे सोपे नसते .अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते . वन संरक्षणा बरोबर घरातील छळ ,हिंसाचार अशा सामाजिक प्रश्नांवरही काम केल्याचे हेरमेलीन बेयपी यांनी सांगितले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ  राजेंद्र शेंडे म्हणाले ,’ वन खात्यात आणि संबंधित उपक्रमात कार्यरत महिलांच्या कर्तुत्वाला सलाम केला पाहिजे . महिला अधिक उत्तमपणे वन संरक्षणाचे काम करीत आहेत . आपण निसर्गापासून दूर जात चाललो आहोत . निसर्ग धोक्यात येत आहे . जंगल ,हवा ,शुद्ध पाणी ,शुद्ध हवा या गोष्टी अनमोल आहेत . पण ,निसर्गालाच प्राधान्य दिले पाहिजे ,हे शहरी मंडळींच्या लक्षात आले आहे .एकत्रित प्रयत्नांनी आपण निसर्गाला जपू शकतो ‘.
   

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading