Saturday, May 30, 2026
Sports

‘सिंधी प्रीमियर लीग’ रंगणार १६ मार्चपासून

पिंपरी, दि. ८ – देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, त्यांच्यात तंदुरुस्तीविषयी जागरूकता व्हावी, तसेच मोबाईल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावर खेळण्याला प्राधान्य द्यावे यासाठी आयोजित केली जाणारी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा १६ मार्च ते ३ एप्रिल २०२१ या कालावधीत पिंपरी येथे रंगणार आहे. यंदाच्या तिसऱ्या हंगामात एकूण १४ संघ सहभागी होणार आहेत.

पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर ही स्पर्धा होणार, त्याचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून पाहायला मिळणार आहे. स्पर्धेतून मिळालेला निधी सामाजोपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येणार असल्याची माहिती कन्वल खियानी, हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वाणी, अवि तेजवानी, अवि इसरानी, रवी दर्यानी, पियुष जेठानी यांच्यासह संघमालक व प्रायोजक उपस्थित होते.

हितेश दादलानी म्हणाले, “पिंपरी चिंचवडमधील विविध क्षेत्रातील उद्योजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. ‘सिंधी प्रीमियर लीग सीजन ३’चे उद्घाटन १६ मार्च २०२१ रोजी होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू, सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच खेळाडू, संघ मालक व कुटुंबीयांची उपस्थिती असणार आहे. ही स्पर्धा देशातील सर्व सिंधी समाजपर्यंत पोहचवायची आहे. एक दिवस जगभरातील सर्व सिंधी समुदायांना आपापल्या शहरांमध्येही अशी स्पर्धा आयोजित करता यावी, हा यामागचा उद्देश आहे. ‘सिंधी फक्त व्यवसायापुरतेच आहेत’ हा समज खोडून काढावा यासाठीही आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत.”

कन्वल खियानी म्हणाले, “गेल्या दोन्ही मोसमात झालेल्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. फेसबुकवर जवळपास ९ लाख लोकांनी ही स्पर्धा पहिली. यंदा स्पर्धेला व्यापक स्वरूप येत असून, पुण्यासह परभणी, जळगाव, नांदेड येथूनही खेळाडू सहभागी होत आहेत. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. १४ संघमालक आपल्या १४ संघांसह स्पर्धेत उतरणार आहेत. आपली संस्कृती साजरी करणे आणि त्याचा प्रसार करणे हेही यामुळे साध्य होणार आहे. त्यातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वंचितांच्या शिक्षणासाठी, विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य केले जाणार आहे.”

या स्पर्धेतील प्रत्येक संघाचे नाव सिंधी समाजाशी आणि संस्कृतीशी निगडित आहे. त्यामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (आशुतोष चंदीरमणि, चंदीरमणि असोसिएट्स), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम सेमीकंडक्टर, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (अनूप झमटानी, झमटानी ग्रुप), एसएसडी फाल्कन (विकी सुखवानी, सुखवानी लाइफस्पेस), इंडस डायनामॉस (सुमित बोदानी, शगुन टेक्सटाईल), दादा वासवानीज ब्रिगेड (अनिल अस्वाणी, अस्वाणी प्रमोटर अँड बिल्डर), झुलेलाल सुपरकिंग्ज (पियुष जेठानी, जेठानी ग्रुप), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (बिपिन डाखनेजा, ट्रिओ ग्रुप), गुरुनानक नाइट्स (प्रकाश रामनानी, पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड), संत कंवरम रॉयल्स (राहुल लाडकानी, व्हीआरए रोहित सेल्स), आर्यन युनायटेड (राजीव मोटवानी, रोहित इन्फ्रा), जय बाबा स्ट्रायकर्स (सागर सुखवानी, सुखवानी बिल्डटेक) व सिंधी इंडियन्स (मनीष मनसुखवानी, बॉंबे सॅन्डविच) अशी या संघांची नावे आहेत. स्पर्धेत १४ संघ असून २२० खेळाडूची नोंदणी झालेली आहे. संघ विकत घेतलेल्या मालकांकडून २५ लाख आभासी (व्हर्च्युअल) चलनातून या खेळाडूंचा लिलाव करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading