चांगले कर्म करताना गुरूजनांची आठवण ठेवा-केंद्रीय तपास यंत्रणेचे पोलीस अधीक्षक डॉ. मच्छिंद्र कडोले यांचे मत

पुणे :  कलाकाराकडे त्याची कला दाखविण्यासाठी वेगवेगळी माध्यमे असतात. जसे चित्रकाराकडे कुंचला, रंग, संगीतकाराकडे सुरेल आवाज असतो. शिक्षक हा इतरांपेक्षा महान कलाकार आहे. त्याची कला सादर करण्यासाठी त्याच्याकडे मन आणि आत्मा ही दोनच माध्यम असतात. त्यांच्या या कलेतूनच अनेक यशस्वी व्यक्तिमत्व घडतात.  शिक्षक विद्यार्थ्यांना घडविताना आपले सर्वस्वपणाला लावतात. म्हणून जीवनात चांगले कर्म करताना गुरूजनांची आठवण ठेवा, असे मत केंद्रीय तपास यंत्रणेचे पोलीस अधीक्षक डॉ. मच्छींद्र कडोले यांनी व्यक्त केले. 

डेक्कन येथील विद्या महामंडळ संस्थेच्या लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्यावतीने पु.ग.वैद्य स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्या महा मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आपटे, कार्यवाह गीता देडगावकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ.ल.देशमुख, मुख्याध्यापिका मेधा सिन्नरकर आदी उपस्थित होते. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी असलेले केंद्रीय तपास यंत्रणेचे पोलीस अधिक्षक डॉ.मच्छिंद्र कडोले यांना पु.ग.वैद्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, ११ हजार रोख रक्कम आदी पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराची रक्कम त्यांनी संस्थेला देणगी स्वरुपात दिली.

डॉ.मच्छिंद्र कडोले म्हणाले, मी कामानिमित्त देशात आणि देशाबाहेर खूप फिरलो. त्यावेळेस काही नाती वगळता सर्व नाती व्यावसायिकच होती. परंतु शाळेत जी मायेची नाती मिळाली ती पुन्हा कुठेच मिळाली नाहीत. पु.ग. वैद्य सरांनी अनेक वेगळे उपक्रम आम्हा विद्यार्थ्यांसाठी राबविले होते. या शाळेतील विद्यार्थी हा फक्त यशस्वी नाही तर उत्तम नागरीक कसा घडेल यासाठी नेहमीच वेगळे उपक्रम राबविले गेले आणि आज ही राबविले जात आहेत, असे ही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शाळेतील आणि पु.ग.वैद्य सरांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. 

अ‍ॅड. अभय आपटे म्हणाले, पु.ग.वैद्य सरांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार शाळेतील यशस्वी विद्यार्थ्याला दिला जातो. यापूर्वी डॉ. अमोल कोल्हे, हिंद केसरी योगेश दोडके,अभिनेता अशोक शिंदे यांना पुरस्कार दिले आहेत. ही शाळा  विद्यार्थ्यांसाठी नेहमीच प्रयोगशील आहे. शंभर प्रयोगांपैकी ९० जरी फसले तरी १० प्रयोग विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयोगी ठरले आहेत. परंतु मच्छिंद्र कडोले सारख्या विद्यार्थ्यांकडे पाहून वाटते की वैद्य सरांचे आणि शाळाचे प्रयोग कधीच फसले नाहीत, असे ही त्यांनी सांगितले. अमोल हरभरे यांनी सूत्रसंचालन केले. गीता देडगावकर यांनी प्रास्ताविक केले. मेधा सिन्नरकर यांनी आभार मानले. 

Leave a Reply

%d bloggers like this: