पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
पुणे : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनची ४१ वी सर्वसाधारण सभा असोसिएशनच्या शिवाजीभाई ढमढेरे सभागृहात पार पडली. असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी अहवाल काळातील कामकाजाचा आढावा घेत सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये घडलेल्या व घडत असलेल्या विविध प्रश्नांचा देखील आढावा यावेळी घेतला.
सभेला असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अॅड. साहेबराव टकले, मानद सचिव संगीता कांकरीया, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलींद काळे, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष माधव माटे, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक किरण मांजरे, रामराज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष सुहास पांगुळ, श्री शारदा सहकारी बँकेचे अध्यक्ष डी.एस.तावरे, साधना सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल तुपे, असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे यांसह अन्य बँकांचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
अॅड.सुभाष मोहिते म्हणाले, सहकारी बँका टिकल्या पाहिजेत व यासाठी सहकारी बँकांची बलस्थाने समाजासमोर आणण्यासाठी सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सहकारी बँकांच्या पदाधिका-यांनी राजकीय विचार व विचारधारा बाजूला ठेऊन केवळ सहकार या एका मुद्यावर एकत्र येऊन सहकारात स्पर्धा करण्याऐवजी सहकारांत सहकार आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
माधव माटे म्हणाले, सहकारी बँका टिकवायच्या असतील, तर सर्वांनी एकत्र राहणे व एकमेकांशी स्पर्धा न करता सहकार्य करणे अपेक्षित आहे. सहकारातील ग्राहक सहकाराबाहेर जाणार नाहीत, याची काळजी देखील आपण घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले. जर्नादन रणदिवे, किरण मांजरे यांनी देखील मनोगत व्यक्त करताना असोसिएशनच्या झेंडयाखाली सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
