जागतिक महिला दिनानिमित्त सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम

पुणे, दि. ८ – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सेवा सहयोग फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने महिला सक्षमीकरण अंतर्गत एक आगळावेगळा उपक्रम करून वस्तीतील महिलांना त्यांचा मान मिळवून दिला. कोरोना काळात काम गमावलेल्या महिलांना प्रशिक्षण देऊन उत्पन्नाचे साधन मिळवून दिले.

सेवा सहयोग फाउंडेशन ही संस्था गेली १५ वर्षे पुणे व मुंबई परिसरात सेवाभावी कार्य करीत आहे. कोरोनाच्या टाळेबंदीत अनेक महिलांचे रोजगार गेले. पुणे परिसरातील अशा वस्तीतील महिलांना पुन्हा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण कार्यांतर्गत महिलांना शिवणकाम, खाद्य वस्तूंचे प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेने या महिलांना केवळ प्रशिक्षित केले नसून त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून दिली आहे.

ज्यूटच्या पिशव्या, कापडी पिशव्या, पर्सेस अशा कापडी वस्तू तसेच खाद्य पदार्थ यांचे पुण्यातील महत्वपूर्ण भागांमधील ५० ठिकाणी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. दि. ५ मार्च ते ८ मार्च दरम्यान भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनांना पुणेकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘हातातले काम गेल्यामुळे एक प्रकारचे नैराश्य आले होते. परंतु आपल्यातही कलागुण आहेत आणि त्यातून आपण पैसे कमवू शकतो असा आता आत्मविश्वास मिळाला’ असल्याचे या महिलांनी सांगितले. या उपक्रमात पुणे परिसरातील विविध वस्त्यांवरील सुमारे ५० महिला व अनेक स्वयंसेवक सहभागी झाले होते.  

सेवा सहयोग फाउंडेशन ही संस्था गेली १५ वर्षे पुणे व मुंबई परिसरात समाजातील दुर्बळ घटकांसाठी शिक्षण तसेच आरोग्य, स्वच्छता, स्वावलंबन अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. गरजू शाळा व सेवा संस्था यांना विविध प्रकारचे सहाय्य मिळवून देण्याचे कामही संस्था करते. ‘समुत्कर्ष’ या वस्ती विकास उपक्रमांद्वारे शहरातील विवध वस्त्यांतून अभ्यासिका चालतात. याशिवाय फिरती विज्ञान प्रयोग शाळा, सेवा दर्शन, पर्यावरण संवर्धन, निर्मल वारी, स्कूल कीट, सॅनीटरी नॅप्कीन उत्पादन केंद्र, वृक्षारोपण, संगणक प्रशिक्षण असे अनेक उपक्रम संस्था चालवते.

Leave a Reply

%d bloggers like this: