दान, तप आणि यज्ञ सांस्कृतिक जीवनाचे आदर्श – मंगला गोडबोले

पुणे : आपल्या संस्कृतीचा गाभा दान, तप आणि यज्ञ यावर अवलंबून आहे. दान म्हणजे नियतीने दिलेले सगळे हे फक्त आपल्यासाठी नाही तर ते कुणाला तरी देणेही अपेक्षित आहे. उपभोगशून्य स्वामीत्व हा आपला सांस्कृतिक आदर्श आहे. तप म्हणजे केवळ आयत्या मिळालेल्या गोष्टी न घेणे तर मी कष्ट करून काही तरी मिळवेन ही धारणा सतत असणे आणि यज्ञ म्हणजे जीवनाच्या यज्ञात आपली एक समिधा घालतो आहोत ही भावना असणे हे आपल्या सांस्कृतिक जीवनाचे आदर्श आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका, समीक्षक मंगला गोडबोले यांनी केले.

कला-साहित्य-सामाजिक कार्य या क्षेत्रांत लक्षणीय कर्तृत्व गाजवणार्‍या व्यक्तींच्या पाठीशी अव्याहतपणे उभ्या राहणार्‍या स्त्रीशक्तीचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वानंदी क्रिएशनतर्फे तपस्या पुरस्कार वितरण सोहळार आज (दि. 6 मार्च) आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार वितरण गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. अंध व्यक्तीचा पती म्हणून जाणिवपूर्वक स्वीकार करणार्‍या आणि अंध मुलींसाठी शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या वसुधा गोखले, बासरी पाळणाघर चालविणार्‍या अर्चना कुंडलकर तसेच कष्टप्रद जीवनात जिद्दीने उभे राहून कुटुंबाचा आधार बनलेल्या व मुलाच्या समाजसेवेला वाहून घेण्याच्या इच्छेला मान देणार्‍या अलका गद्रे यांना स्वानंदी पुणेतर्फे ‘तपस्या पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. गोखले यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला असून त्यांच्या वतीने त्यांची कन्या तेजस्विनी साठे आणि पुत्र प्रमोद गोखले यांनी स्वीकारला.

गोडबोले म्हणाल्या, मुलांच्या उभारीच्या काळात त्यांच्या कल्पनांना अनेक धुमारे फुटत असतात त्या काळात संघर्ष न करता त्यांना खंबीरपणे साथ देणे महत्त्वाचे असते. पण ही गोष्ट खूप अवघड असते. एखादे काम वर्षानुवर्षे सौम्यपणे करणे यासाठी एक वेगळ्या प्रकारची मानसिकता, मनोबल लागते. तशा प्रकारचे मनोबल या पुरस्कार प्राप्त महिला दाखवित आल्या आहेत त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. स्वानंदी क्रिएशनचा हा उपक्रम अतिशय अभिनंदनीय आहे.

पुरस्काराला उत्तर देताना अर्चना कुंडलकर म्हणाल्या, एखाद्या कलाकारामागे संपूर्ण कुटुंब उभे असते तेव्हाच तो कलाकार घडतो; मोठा होतो. कलाकार घडविताना सगळेच पालक मेहनत घेतात. पालकांनी मुलांसाठी जरूर मेहनत घ्यावी, त्यांना संधी द्यावी. आयुष्यात काही निर्णय चुकले तरी मुलांना समजून घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत चंद्र वाढतो कलेकलेने कलाकारही त्या प्रमाणे, नको अमावस्या त्यांच्या द्वारी, फिनिक्ससारखी घेऊ दे भरारी अशा भावनाही कुंडलकर यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पूर्णवेळ प्रचारक म्हणून गेलेल्या मुलाच्या निर्णयाला खंबीरपणे साथ देणार्‍या अलका गद्रे म्हणाल्या, देशाच्या सेवेसाठी प्रत्येक घरातून एकतरी व्यक्ती पुढे आली पाहिजे. थोरामोठ्या व्यक्तींच्या सहवासामुळे आपले आयुष्य बदलते, विचार बदलतात, हे मुलाच्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध झाले असल्याचे त्यांनी मोठ्या गौरवाने सांगितले.

प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा लेखक सचिन कुंडलकर आणि नृत्यांगना तेजस्विनी साठे यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्काराच्या मानपत्राचे लेखन वंदना बोकिल-कुलकर्णी यांचे होते.

मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्वानंदी क्रिएशनच्या अपर्णा केळकर यांनी विषद केली. सुरुवातीस सौम्या महाडिक हिने भूमाता स्तोत्र सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन मंजिरी धामणकर यांनी केले. मकरंद केळकर यांनी आभार मानले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सुयोग कुंडलकर यांच्या बंदिशी व संत रचना आरती कुंडलकर आणि अपर्णा केळकर यांनी सादर केल्या. सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), कौशिक केळकर (तबला), आदित्य आपटे (तालवाद्य), प्रथमेश देवधर (पखवाज) यांनी साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: