राज्यात १ एप्रिलपासून नवीन विजेचे दर लागू

मुंबई, दि. ४ – राज्यात १ एप्रिलपासून नवीन वीजदर लागू होणार आहेत. त्यामुळे कोरोना काळात फुगलेल्या वीजदरांमध्ये किंचितसा दिलासा राज्य वीज नियामक आयोगाकडून देण्यात आला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने आगामी पाच वर्षांसाठी राज्यातील वीज ग्राहकांचे वीजदर कसे असतील हेदेखील जाहीर केले आहे. त्यामुळे २०२०-२१ ते २०२४-२५ पर्यंत या कालावधीत वीजदर कसे असतील याबाबतचा आदेश राज्य वीज नियामक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या राज्यातील वीज ग्राहकांकडून वीजदरात सवलत मिळावी अशी मागणी होत होती. पण आजच्या वीज नियामक आयोगाच्या निर्णयात कोणतीही दरवाढ जाहीर करण्यात आली नसल्याने ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांना राज्य वीज नियामक आयोगाने १ एप्रिल २०२१ पासून लागू होणाऱ्या वीजदरांमध्ये सरासरी १ टक्के वीजबिलात कपात केली आहे. त्यामुळे महावितरणच्या घरगुती ग्राहकांना वीज वापरासाठी आता प्रत्येक युनिटमागे ७.५८ रूपये मोजावे लागतील. अदाणीच्या वीज ग्राहकांसाठीही ०.३ टक्के इतकी वाढ लागू होणार आहे. त्यामुळे अदाणीच्या ग्राहकांना आता ६.५३ रूपये प्रत्येक युनिटसाठी मोजावे लागतील. बेस्टच्या वीज ग्राहकांसाठी ०.१ टक्के इतकी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टच्या वीज ग्राहकांना आता युनिटमागे ६.४२ रूपये मोजावे लागतील. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांसाठी यंदाच्या १ एप्रिलपासून मोठी वीज दरवाढी जाहीर झाली आहे. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना आता युनिटमागे ५.२२ रूपये मोजावे लागतील. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांसाठी ४.३ टक्के दरवाढ आयोगाने मंजुर केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: