संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ, शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई – टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी पोहरादेवी येथे केलेले शक्तिप्रदर्शन त्यांच्यासाठी अडचणीचं ठरणार असल्याची शक्यता आहे. या शक्तिप्रदर्शनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. काल, मंगळवारी शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राठोड यांच्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर गेल्या 14 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले संजय राठोड मंगळवारी बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या पोहरादेवी गडावर दाखल झाले. तिथे त्यांनी दर्शन घेतले व माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी राठोड समर्थक व बंजारा समाज बांधवांची मोठी गर्दी उसळली होती.

राठोड यांच्याकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनावर मुख्यमंत्रीदेखील नाराज असल्याचं समजतं. संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं. संजय राठोड यांच्यावरील आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचं पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

पोहरादेवी धर्मपीठ वाशीम जिल्ह्यात असून या जिल्ह्यात करोना संसर्ग वाढत असताना हे शक्तिप्रदर्शन एका मंत्र्यानेच केल्याने राठोड आणखी गोत्यात आले आहेत. शिवसेनेच्याच एका मंत्र्याने गर्दी जमा करून नियम मोडल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट महत्त्वाची ठरली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: