लेखन कालसुसंगत असावे – सचिन पवार

पुणे – ज्यांचे सरकार असते ते लोक अनेकदा उर्मटच असतात. त्यातला खालचा कार्यकर्ता अधिक कट्टर असतो आणि तो आपल्या विरोधी विचाराची जी व्यक्ती, विचार, प्रतीक असेल तर त्याला अधिकाधिक त्रास देतो. त्यामुळे लेखन करताना या गोष्टींचा विचार केला तर ते अधिक कालसुसंगत होते, असे मत संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार यांनी व्यक्त केले.

चपराक साहित्य महोत्सवात विनोद पंचभाई यांच्या मेवाडनरेश महाराणा प्रताप या कादंबरीचे आणि रमेश वाघ यांच्या महाराष्ट्राचे विचारदुर्ग या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी सुप्रसिद्ध गायक पं. यादवराज फड, चपराकचे प्रकाशक घनश्याम पाटील उपस्थित होते.

पवार म्हणाले, चपराकने आज या दोन्ही लेखकांच्या माध्यमातून एक वैराग्याचे पुष्प आणि दुसरे विरत्वाचे पुष्प वाचकांच्या हाती दिले आहे. बोलणारी लोक ही लिहिण्याच्या संदर्भात उदासीन असतात. कीर्तनकारांचे चिंतन उत्तम असल्याने त्यांना संतपरंपरेचे वेगवेगळे आयाम उत्तमप्रकारे माहीत असतात. त्यामुळे रमेश वाघ यांनी कीर्तनकार असूनही लेखणी हातात घेतली हे कौतुकास्पद आहे. संप्रदायाचा गाभा कळणारी मंडळी लिहित नाहीत आणि विद्यापीठीय मंडळी संत साहित्यावर लिहिताना भाषावैशिष्ट्याच्या संदर्भाने लिहितात मात्र संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाच्या बाजूने लिहित नाहीत.

आजच्या कोरोनाच्या काळातही चपराक प्रकाशन सातत्याने विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके प्रकाशित करीत आहे ही मराठी भाषेच्या दृष्टीने मोठी गोष्ट असल्याचे पं. यादवराज फड यांनी सांगितले. यावेळी लेखक विनोद पंचभाई आणि रमेश वाघ यांनी आपापल्या पुस्तकामागची भूमिका उगलडून दाखवली. प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले तर कवी माधव गिर यांनी सूत्रसंचालन केले.

चपराक महोत्सवाला स्थगिती
सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 28 फेबु्रवारीपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे चपराक साहित्य महोत्सवातील दि.23 पासूनचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले असून वातावरण सुरळीत होताच पुढील कार्यक्रमांची घोषणा करू असे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: