Wednesday, June 17, 2026
PUNE

प्रदीप पुरंदरे यांना ‘जलमित्र’ तर संजय पाटील यांना ‘बीजमित्र’ पुरस्कार प्रदान

पुरंदर:  पाणी पंचायतीचे प्रवर्तक कै. विलासराव साळुंखे यांच्या स्मृती निमित्त ग्राम गौरव प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे कृषी व जल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभ्यासक- कार्यकर्त्यांना दिले जाणारे वार्षिक पुरस्कार नुकतेच शेतकरी प्रशिक्षण केंद्र, खळद (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे आयोजित केलेल्या ‘ग्रामीण विकास मंथन’ कार्यशाळेच्या दरम्यान देण्यात आले.

या कार्यक्रमात ‘जलमित्र’ पुरस्कार ज्येष्ठ जलनियोजन तज्ञ प्रदीप पुरंदरे यांना तर ‘बीजमित्र’ पुरस्कार  सेंद्रिय शेती आणि बीज संवर्धन कार्यकर्ते संजय पाटील यांना ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक सागर धारा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. गौरवपर मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या प्रसंगी बोलताना प्रदीप पुरंदरे यांनी कै. विलासरावांच्या भेटीच्या आठवणी सांगितल्या व त्यांच्या ‘समन्यायी पाणी वाटप’  धोरणाच्या आवश्यकतेविषयी प्रतिपादन केले. पुरंदरे यांनी पुरस्कार रकमेत स्वत:ची भर घालून, देणगीदाखल ती पाणी पंचायतीच्या अध्यक्ष श्रीमती कल्पनाताई साळुंखे यांच्याकडे सुपूर्द केली. संजय पाटील यांनी पुरस्कार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्यामुळे काम करत राहण्यास उमेद मिळाल्याचे सांगितले.

सदर ‘ग्रामीण विकास मंथन’ कार्यशाळेचे आयोजन ग्राम गौरव प्रतिष्ठान (पाणी पंचायत), पर्यावरण समृद्धी मंच, आणि साऊथ अशियन पीपल्स ऍक्शन फॉर क्लायमेट क्रायसिस (SAPACC) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या प्रसंगी पाणी पंचायतीच्या डॉ. सोनाली शिंदे, शेती प्रश्नाचे अभ्यासक पांडुरंग शितोळे, इकॉलॉजिकल सोसायटीचे विश्वस्त प्रा. गुरुदास नूलकर, वनराईचे सचिव अमित वाडेकर, ज्येष्ठ पर्यावरणवादी दिलीप कुलकर्णी,  जगदीश चौधरी, मोहन पाटील, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading