Wednesday, June 17, 2026
PUNE

ग्रामीण भागातील एक लाख शाळांचेकरणार डिजिटायझेशन – संतोष तळघट्टी

पुणे : “ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उर्मी, कौशल्य क्षमता मोठी आहे. शहरी विद्यार्थ्यांसारख्या सुविधा त्यांना उपलब्ध झाल्या, तर तेही वैश्विक स्तरावर आपली ओळख निर्माण करतील. हीच गोष्ट लक्षात घेऊन नमस्कार विथ लव्ह फाउंडेशन व ग्लोबल क्लासरूम्सच्या माध्यमातून जगभरातील शाळा एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील एक लाख शाळांचे डिजिटायझेशन पुढील काळात करण्याचे ध्येय आहे,” असे मत संगणक तज्ज्ञ आणि ग्लोबल क्लासरूम्स व नमस्कार विथ लव्ह फाउंडेशनचे संस्थापक संतोष तळघट्टी यांनी व्यक्त केले.

मुळशी तालुक्यातील कोंढुर येथील अमृतेश्वर विद्यालय या आदिवासी शाळेतील पाचवी ते दहावीतील १०० विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या वतीने दफ्तर, कंपास बॉक्स, स्टेशनरी, मास्क व इतर शालेय साहित्य भेट देण्यात आले. प्रसंगी संतोष तळघट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, गट शिक्षण अधिकारी माणिक बांगर, विस्तार अधिकारी सचिन लोखंडे, केंद्र प्रमुख सोपान ठाकोरे, अमृतेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे,कोंढुरच्या सरपंच सारिका कुडले, अंकिता खुडे, संचालक तानाजी शिंदे, विठ्ठल हालंदे, सुरेश दिघे आदी उपस्थित होते.

संतोष तळघट्टी म्हणाले, “नमस्कार विथ लव्ह फाउंडेशन मानवतावादी दृष्टीकोनातून ग्रामीण भागात डिजिटल शिक्षण, आरोग्य, महिला व शिक्षक सक्षमीकरण, ई-गव्हर्नन्स या क्षेत्रात काम करत आहे. ग्रामीण भागातील शाळांचे डिजिटायझेशन करण्याचे अभियान हाती घेतले आहे. विद्यार्थी, शिक्षक, तज्ज्ञ व्यक्तींना घेऊन ग्लोबल क्लासरूम्स जगभर विस्तारत असून, जगभरातील एक लाख ग्रामीण शाळांना डिजीटाईज करून एक कोटी विद्यार्थ्यांना वैश्विक मूल्याधिष्टित शिक्षण देण्याचे उद्दिष्ट्य आहे. या कामात अमेरिकेतील स्वयंसेवी समुहाचेही सहकार्य मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील १०० गावे दत्तक घेत असून, तिथे शिक्षकांच्या सबलीकरणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ग्लोबल क्लास आणि मोबाईल क्लास प्रकल्प राबविणार आहोत.”

महादेव कोंढरे म्हणाले, “ग्रामीण भागातील शाळांना साहाय्य आणि प्रोत्साहन देण्याचा नमस्कार विथ लव्ह फाऊंडेशनचा पुढाकार कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन, शाळा डिजिटलायझेशन, शिक्षकांचे प्रशिक्षण, स्मार्ट खेडे यांसारखे कार्यक्रम त्यांच्याकडून होत आहेत.” सारिका कुडले म्हणाल्या, “आदिवासी भागातील महिला आणि मुलींना साहाय्य करणे सध्या काळाची गरज आहे. या भागातील लोकांसाठी नमस्कार विथ लव्ह फाऊंडेशन सोबत काम करायला मिळत आहे याचा मला आनंद आहे.” माणिक बांगर म्हणाले, “ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना आज विविध संस्थांच्या मदतीची गरज आहे. त्यातही आदिवासी भागातील शाळांची असलेली मोठी गरज फाऊंडेशनच्या वतीने भागविण्यात आली. शाळेचे डिजिटायझेशन झाल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना वैश्विक ज्ञान मिळेल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading