विशेष मुलांनी घेतले इलेक्ट्रिक माळा व शिवणकामाचे धडे

पुणे : कानाने ऐकू येत नसले, बोलता येत नसेल, तरी स्वत: पायावर उभे राहण्याच्या जिद््दीने विशेष मुलांनी इलेक्ट्रिक माळा तयार करणे आणि शिलाई मशिनवर शिवणकाम करण्याचे प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ केला. विशेष मुलांचे समाजात अस्तित्व निर्माण व्हावे आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी विद्या महामंडळ संस्थेचे मूक बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्र आणि रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर यांच्या एकत्रित प्रयत्नातून विशेष मुलांना इलेक्ट्रीक माळा, शिलाई मशीन आणि वस्तूंच्या उत्पादनासाठी विविध साहित्य देण्यात आले. 

विद्या महामंडळ संस्थेचे मूक बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्र आणि रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर  यांच्या वतीने विशेष मुलांसाठी कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन आपटे प्रशाला येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख, रोटरी क्लबच्या डॉ.शोभा राव, अंजली रावेतकर, विद्या महामंडळ संस्थेचे मूक बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्राच्या गीता देडगावकर आदी उपस्थित होते. 

डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले, लहान वयाच्या विद्यार्थ्यांपासून २५ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विद्या महामंडळ संस्थेचे मूक बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्र काम करते. सामान्य विद्यार्थ्यांबरोबर हे विद्यार्थी शिकतात. त्याला एकात्मता शिक्षण योजना म्हटले जाते. विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात, जेणेकरुन विद्यार्थी आर्थिदृष्टया स्वावलंबी होतील. विद्यार्थ्यांनी  तयार केलेले साहित्य समाजाने विकत घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे. मूकबधिर मुले उत्तम साहित्य करतील, परंतु मार्केट नसले तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे धनिकांनी किंवा सामाजिक परिवर्तनासाठी साहित्य विकत घेण्याची कृपा करावी, अशी विनंतीही त्यांनी केली. 
डॉ. शोभा राव म्हणाल्या, मुलांनी स्वत: काहीतरी करायला हवे. त्यांना काय शिकविले तर ते पुढे जातील. यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले. कमी कष्टात या मुलांना जास्त पैसे कसे मिळवून देता येतील, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. मोठी स्वप्ने पाहिली तर ती साकारण्यासाठीचे मार्ग दिसू लागतात. मुलांसाठी आवश्यक साहित्य रोटरी क्लब शिवाजीनगरतर्फे दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. अश्विनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. गिरीष चांदेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: