शिक्षित माणूसच जातिनिष्ठ होत आहे – उल्हास पवार
पुणे : मानव अशिक्षित होता तेव्हा समाधानी होता; पण मानव जसजसा शिक्षित होत आहे तसा जातिनिष्ठ होत आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी व्यक्त केली.
शाहू-फुले-आंबेडकर विचारमंच व आडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदाचा मानवतावादी कार्यकर्ता पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. विलास आढाव यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी पवार अध्यक्षपदावरून बोलत होते. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर, डॉ. विलास वाघ, डॉ. निशा भंडारी, विठ्ठल गायकवाड, दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले, पू. भंते यांची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, जगाला प्रेरणा देणारे महामानव आपल्या भूमीत होऊन गेले. जातीअंतासाठी महामानवांनी पुढाकार घेतला आहे, पण आज जात-पात वाढली आहे. जातीअंत होत नाही तोपर्यंत कुठलाही समाज पुढे जाऊ शकणार नाही.
सत्काराला उत्तर देताना आढाव म्हणाले, विज्ञानाने प्रगती केली असली तरी आज मानव मानवापासून दूर जात आहे. स्वच्छतेचे अभियान राबविता-राबविता गाडगेमहाराज यांनी मानवतावादी विचारांची पेरणी केली. अशा महामानवांचे विचार समाजात रुजविण्याची आज गरज आहे.
प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना अॅड. आडकर म्हणाले, संतांमुळे आपल्याला माणुसकीची शिकवण मिळते. आजच्या युगात माणूसधर्म पाळाला तरी भरपूर आहे. संतांच्या शिकवणीतून पुढची पिढी घडविणार्या शिक्षकाची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. आडकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.