भाषादिनानिमित्त ‘चपराक’चा साहित्य महोत्सव

पुणे – मराठी मातृभाषा दिन सप्ताहानिमित्त चपराक प्रकाशनने साहित्यिक आघाडी घेतली असून आजपासून (रविवार, दि. 21) 27 फेबु्रवारीपर्यंत राज्यभरातील लेखकांची पुस्तके रोज प्रकाशित होणार आहेत. तसेच आरोग्य आणि विनोद या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दिली.

आज सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ‘अर्धशतकातील अधांतर – इंदिरा ते मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी आणि निवेदक सुधीर गाडगीळ यांची यावेळी विशेष उपस्थिती असेल. सोमवारी विनोद पंचभाई यांच्या ‘मेवाडनरेश महाराणा प्रताप’ या कादंबरीचे आणि रमेश वाघ यांच्या महाराष्ट्राचे विचारदुर्ग या संतचरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन पं. यादवराज फड आणि युवा वक्ते सचिन पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. गुन्हेगारी क्षेत्रातील महिलांवर आधारित असलेल्या सुरेखा बोर्‍हाडे यांच्या बाईची भाईगिरी या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी करण्यात येईल. किशोरचे संपादक किरण केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमाला भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक उपस्थित असतील.

बुधवारी जयदीप विघ्ने यांचा भोंगळा पाऊस आणि जयश्री सोन्नेकर यांच्या व्यथिता या कथासंग्रहांचे प्रकाशन करण्यात येईल. संजय सोनवणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास कथाकार चंद्रलेखा बेलसरे उपस्थित असतील. गुरूवारी वैद्य ज्योति शिरोडकर यांच्या ‘आरोग्यतरंग’ या पुस्तकावर एमकेसीएलचे विवेक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यात रूबी हॉल क्लिनिकच्या अतिदक्षता विभागाच्या संचालिका डॉ. प्राची साठे, ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ अरविंद कुलकर्णी, केतकी जोशी सहभागी होतील.
या साहित्य सप्ताहात विनोदी लेखनाचीही यथायोग्य दखल घेण्यात आली असून सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार सुभाष खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली विनोदी साहित्याचे उज्ज्वल भवितव्य या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्रीनिवास भणगे, बन्डा जोशी, साईनाथ पाचारणे सहभागी होतील. याचवेळी आनंद देशपांडे यांच्या ‘विनोदाचा व्हेन्टिलेटर’ या विनोदी लेखसंग्रहाचेही प्रकाशन करण्यात येईल.

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीचे औचित्य साधत प्रशांत केंजळे यांच्या ‘गुलमोहराचे कुंकू’ आणि गणेश आटकळे यांच्या ‘शोधक’ या कवितासंग्रहांचे प्रकाशन शनिवारी होईल. सुप्रसिद्ध कवी म. भा. चव्हाण हे या सत्राचे अध्यक्ष असतील तर कवयित्री अंजली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील. ‘चपराक’कडून सदानंद भणगे, नागेश शेवाळकर, किरण भावसार, राजेंद्र उगले यांची बालसाहित्याची आणि शंकर पांडे, नरहरी पत्तेवार यांची वैचारिक पुस्तकेही प्रकाशित होत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: