महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या मानद अध्यक्षपदी मोहन जोशी

पुणे, दि. २० – महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या मानद अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या निधनाने संस्थेचे मानद अध्यक्षपद रिक्त झाले होते. संस्थेच्या संचालक मंडळाने सर्वानुमते मोहन जोशी यांची या पदावर नियुक्ती केली.

त्यानिमित्ताने मोहन जोशी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. टिळक रस्त्यावरील संस्थेच्या अशोक विद्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या चेअरमन सुमन घोलप, सचिव प्रसाद आबनावे, संचालक प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, दिलीप आबनावे, प्रकाश आबनावे, छाया आबनावे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांच्यासह संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम झाला.

सत्काराला उत्तर देताना मोहन जोशी म्हणाले, “शालेय वयापासून संस्थेची वाटचाल पाहिली आहे. गुरूवर्य सि. धो. आबनावे, डॉ. विकास आबनावे यांच्या कार्यकुशलतेतून संस्थेची प्रगती झाली आहे. डॉ. विकास आबनावे यांचे अकाली जाणे माझ्यासाठी अतिशय दुःखदायक आहे. संस्थेच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत ठेवण्याचे दायित्व आमच्यावर आहे. प्रसाद आबनावे आणि नवीन तरुण संचालक मंडळाच्या एकत्रित प्रयत्नातून संस्थेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न राहील. संस्थेच्या शताब्दी महोत्सवात संस्थेचा विस्तार होताना आपल्याला पाहायला मिळेल.”

सुमन घोलप म्हणाल्या, “अनेक विद्वान मंडळींनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. मोहन जोशी लहानपणापासून संस्थेशी निगडित आहेत. त्यामुळे संस्थेच्या प्रगतीत ते अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतील. सामाजिक, राजकीय अनुभवाचा लाभ संस्थेला होईल. डॉ. विकास आबनावे यांच्या कार्याला पुढे घेऊन जाण्यात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.”

प्रसाद आबनावे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून मोहन जोशी यांची संस्थेशी जवळीक आहे. त्यांच्यामुळे अनेक मोठमोठी व्यक्तिमत्वे संस्थेत आली. संस्थेला सर्वव्यापी करत जनमानसात घेऊन जाण्याचे कार्य त्यांच्याकडून होत आहे. त्यांच्या नेतृत्वात पुढील काळात हे काम अधिक व्यापक होईल. संस्थेची शताब्दी प्रगतीची शिखरे गाठणारी ठरेल, असा विश्वास वाटतो.”

प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे यांनीही मनोगत व्यक्त केले. वर्षा कुलकर्णी यांनी प्रास्तविक, तर गौरी पास्ते यांनी सूत्रसंचालन केले. कीर्ती पेशवे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: