रेडी-टू-मूव्ह-इन घरांनाच अद्यापही पसंती, प्राॅपटायगर अहवाल

पुणे – महामारीने ग्रासलेल्या २०२० मध्ये प्राथमिक बाजारपेठेतील एकूण घरांच्या विक्रीपैकी रेडी-टू-मूव्ह-इन (आरटीएमआय) घरांच्या विक्रीचा वाटा हा २१ टक्क्यांपर्यंत वाढला, जो त्याच्या मागील वर्षाच्या तुलनेत १८ टक्के होता. प्राॅपटायगर डाॅट काॅमच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. बांधकाम पूर्ण न झालेल्या प्रकल्पांमध्ये असलेले संभाव्य धोके टाळण्यासाठी बांधकाम पूर्ण झालेल्या सदनिका खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे.

रिअल इन्साईट रेसिडेन्शियल अॅन्यूअल राउंड-अप २०२० या नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालामध्ये प्राॅपटायगरने म्हटले आहे की २०२० या वर्षामध्ये एकूण १,८२,६४० घरांची विक्री झाली व त्यापैकी २१ टक्के घरे ही आरटीएमआय या प्रकारची होती आणि ७९ टक्के घरांचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते.  

२०१९ मध्ये एकूण ३,४७,५९० घरांची विक्री झाली होती व त्यापैकी १८ टक्के घरे ही आरटीएमआय प्रकारची होती. आरटीएमआय प्रकारच्या घरांची खरेदी करण्याचा कल २०१६ पासून वाढत असल्याचेही प्राॅपटायगरच्या संशोधन अहवालाचा निष्कर्ष समोर आला आहे.

आरटीएमआय प्रकारच्या घरांचा वाटा २०१५ मध्ये एकूण विक्रीपैकी ७ टक्के होता. हा वाटा २०१६ मध्ये १० टक्के एवढा झाला, २०१७ मध्ये १२ टक्के, २०१८ मध्ये १५ टक्के आणि २०१९ मध्ये १८ टक्के एवढा झाला.

“कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून स्वतःचा बचाव करणाऱ्या ग्राहकांचा कल हा रेडी-टू-मूव्ह-इन (आरटीएमआय) फ्लॅट्स खरेदी करण्याकडे वाढला आहे. बांधकाम अपूर्ण असलेल्या प्रकल्पांमध्ये ग्राहक ब्रँडेड डेव्हलपर्सच्या किंवा प्रकल्प पूर्ण करण्याबाबत ज्यांचे नाव विश्वासार्ह आहे अशा विकसकांच्या प्रकल्पातील घरे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे,” अशी माहिती ध्रूव अगरवाला, समूह सीईओ, हाउसिंग डाॅट काॅम, मकान डाॅट काॅम आणि प्राॅपटायगर डाॅट काॅम यांनी दिली.

२०२० मध्ये विविध शहरांपैकी, एकूण घरांच्या विक्रीपैकी आरटीएमआय घरांचा सर्वाधिक म्हणजे ३२ टक्के वाटा चेन्नई मध्ये होता तर सर्वात कमी म्हणजे १२ टक्के हैदराबाद शहरात होता. मात्र २०२० मध्ये एकूण विक्रीपैकी आरटीएमआय घरांच्या विक्रीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधक वाढ म्हणजे १७ टक्क्यांची वाढ (२७ टक्के एवढे प्रमाण) दिल्ली-एनसीआर शहरात आढळून आले.

ग्राहकांचा वाढणारा आत्मविश्वास

सर्वसाधारणतः सुधारणा होत असलेल्या आर्थिक परिस्थितीला अनुसरून, निवासी सदनिकांची मागणी आणि पुरवठा हे कोव्हिड-पूर्व काळातील पातळीवर पुन्हा येत आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत शांत झालेल्या कामगिरीनंतर २०२० वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये सदनिकांच्या विक्री आणि नवीन प्रकल्पांच्या लाँचमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही  दिसून येत आहे.

डिसेंबर २०२० च्या ताज्या प्राॅप टायगर संशोधन अहवालातून हे स्पष्ट होते की रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत ग्राहकांमध्ये आत्मविश्वास आहे आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने हे क्षेत्र त्यांच्या पसंतीचे आहे. सर्वेक्षणामध्ये ४३ टक्के लोकांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत तर २१ टक्के लोकांना मुदत ठेवी (एफडी) आणि २० टक्के लोकांनी स्टाॅक मार्केट गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. 

देशात लाॅकडाउन सुरू असताना मे २०२० मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये, ३५ टक्के लोकांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याकडे, तर अनुक्रमे २२, १५ आणि २८ टक्के लोकांनी मुदत ठेवी, स्टाॅक आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल व प्राधान्य असल्याचे म्हटले होते.

वर्क फ्राॅम होमची परिस्थिती आणखी बराच काळ सुरू राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, डिसेंबर २०२० च्या सर्वेक्षणात असे सुद्धा आढळून आले की ४७ टक्के लोकांनी मोठ्या घरांना पसंती दिली आहे. मे २०२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणात फक्त ३३ टक्के लोकांनी मोठ्या घरांना पसंती दिली होती. 

“कोरोनाव्हायरसच्या प्रसारानंतर आता मोठ्या घरांसाठी मागणी वाढली आहे. वास्तूच्या मूल्यांकनाच्या वाढीच्या दृष्टीने आणि आर्थिक सुरक्षिततेच्या भावनिक दृष्टीकोनातून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीला ग्राहकांनी नेहमीच पसंती दिली आहे. कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदनिका खरेदीसाठी पुन्हा ग्राहकांचा कल वाढला आहे आणि विशेषतः मिलेनिअल्सकडून अधिक वाढला आहे,” असेही अगरवाला यांनी सांगितले.

प्राॅपटायगर संशोधनाच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले होते. एप्रिल – मे २०२० या कालावधीत तसेच सप्टेंबर – डिसेंबर २०२० या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले. आठ शहरातील सर्वसमावेशक प्रतिनिधीत्वासाठी स्ट्रॅटिफाइड रॅन्डम सँप्लिंग पद्धतीचा या सर्वेक्षणासाठी वापर करण्यात आला. सर्वेक्षणाच्या दोन्ही कालावधीमघ्ये तीन हजार संभाव्य ग्राहकांची मते नोंदविण्यात आली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: