१४ व्या वसंतोत्सवाला सुरूवात

–    तीन दिवसीय सांगितिक महोत्सवाचे अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि १९ – डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वसंतोत्सवाला आजपासून स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे सुरुवात झाली. महोत्सवाचे हे सलग १४ वे वर्ष असून आज प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, सारस्वत बॅकेच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता संधाणे, रावेतकर गृपचे व्यवस्थापकीय संचालक अमोल रावेतकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांचे पुत्र बापू देशपांडे, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची कन्या रेणूका देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत महोत्सवाला सुरूवात करण्यात आली.

शनिवार २० फेब्रुवारी आणि रविवार २१ फेब्रुवारी सायं ४ ते १० वाजेपर्यंत सदर महोत्सव गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडणार आहे.

संगीतमार्तंड पं जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या सुरेल गायनाने आज महोत्सवाच्या पहिला दिवसाची सुरूवात झाली. त्यांनी राग मुलतानी गात आपल्या गायनाला सुरूवात केली.  यामध्ये त्यांनी ‘ये गोकुलगांव का छोरा….’, ‘अजब तोरी बात, अजब तेरो काम…’, ‘आए मोरे साजनवां’ या बंदिशी सादर केल्या. गोविंद दामोदर माधवेती स्तुतीने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना अभिनय रवंदे (संवादिनी), रामकृष्ण कळंबेकर (तबला), मानसी महाजन आणि आदिती गोसावी यांनी तानपु-यावर साथसंगत केली.

यानंतर ज्येष्ठ धृपद गायक पं उदय भवाळकर यांचे गायनाने उपस्थितांनी धृपद गायिकीची अनुभुती घेतली. पं वसंतराव देशपांडे यांची १९८२-८३ मध्ये भोपाळला भेट झाली होती. त्यावेळी त्यांचे दर्शन झाले आणि त्यांना ऐकण्याची संधी मिळाली अशा आठवणी पं भवाळकर यांनी सांगितल्या. त्यांना प्रताप आव्हाड (पखावज), प्रसन्ना विश्वनाथन आणि चिंतामणी बसू (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

यंदाचा महोत्सव डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षपूर्ती सोहळा म्हणून आयोजित करण्यात येणार असून त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना रसिकांना यावर्षी धृपद गायन, शास्त्रीय गायन, तालवाद्य, दक्षिणात्य व हिंदुस्थानी संगीताचा मेळ असलेल्या वैविध्यपूर्ण संगीताची मेजवानी मिळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: