भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

चेन्नई – भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ १६४ धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे भारतीय संघाने दुसरा सामना ३१३ धावांनी जिंकला. या विजयासाह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. विस्फोटक सलामी फलंदाज रोहित शर्माची शतकी खेळी, अनुभवी आर. अश्विनची अष्टपैलू कामगिरी आणि पदार्पणवीर अक्षर पटेलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात निर्वादित वर्चस्व गाजवलं.

पहिल्या डावात रोहित शर्माच्या १६१ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ३२९ धावा केल्या होत्या. त्यानंतर पहिल्या डावात गोलंदाजी करताना अश्विनने पाच बळी घेतले, तर दुसऱ्या डावात तीन बळी मिळवत त्याने सामन्यात ८ बळी मिळवले आहेत. त्याशिवाय दुसऱ्या डावात फलंदाजी करताना अश्विनने शतकी खेळी केली होती. तसेच पदार्पणवीर अक्षर पटेलने दुसऱ्या डावात इंग्लड संघाचे पाच बळी घेतले. त्याने पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात पाच असे सात जणांना बाद केले. तर कुलदीप यादवला दोन बळींवर समाधान मानावे लागले. तसेच ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

Leave a Reply

%d bloggers like this: