प्रेम भावनेचा प्रतिसाद म्हणजे कविता – संदीप खरे

पुणेः- प्रेम भावना ही अत्यंत नैसर्गीक भावना असून त्या प्रेम भावनेचा प्रतिसाद म्हणजे कविता होय, असे मत प्रसिद्ध कवी संदीप खरे यांनी व्यक्त केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जागतीक प्रेमदिनाच्या ( व्हॅलेंनटाईन डे ) च्या निमित्ताने
ज्येष्ठ कवी आणि गझलकार म.भा. चव्हाण यांच्या हस्ते आज जना-मनात कवितेच्या माध्यमातून प्रेम भावना रुजविणारे सर्वात तरुण कवी संदीप खरे यांना ‘सर्वोत्कृष्ट प्रेमकवी’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी पुरस्काराला उत्तर देतांना खरे बोलत होते. सन्मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यावेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे संस्थापक अॅड.प्रमोद आडकर, रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मैथिली आडकर आणि रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागाच्या समन्वयक शिल्पा देशपांडे उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना कवी संदीप खरे म्हणाले की, प्रेम ही भावना अतिशय तरल आहे. प्रेम ही केंद्रीय संकल्पना ठेऊन काव्य निर्मीती करतांना शब्द हात जोडून समोर उभे असतात.

यावेळी बोलताना म.भा. चव्हाण म्हणाले की, आयुष्यावर बोलू काही म्हणता म्हणता नवीन पिढीला कवितेवरही बोलायला लावणारा संवेदनशील कवी, गायक म्हणून संदीप खरे यांचा उल्लेख करता येईल. संदिप खरे यांनी मधाळ आणि सोप्या शब्दांनी प्रेम कवितांना नवा आयाम दिला. जड, अवघड, अलंकारयुक्त शब्दांशिवाय कविता सुंदर, साधी, सोपी होऊ शकते, हे खरे यांनी दाखवून दिले. कवितांमध्ये अधिकाधिक गेयता आणून त्याच्या सादरीकरणाचा दर्जा देखील खरे यांनी वाढविला आहे.

शिल्पा देशपांडे यांनी संदीप खरे यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानचे अॅड.प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मैथिली आडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: