पुण्यातील स्टार्टअप कंपनीकडून फेसबुकवर ‘ऍप’ चोरीचा दावा

पुणे, दि. 8 – ‘मोर दॅन जस्ट फ्रेंड्स’ (एमटीजेएफ) या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने त्यांच्या ऍपविषयीची कल्पना कॉपी केल्याने फेसबुकवर दावा दाखल केला आहे. फेसबुककडून आपल्याला मदत होईल, या अपेक्षेने ‘एमटीजेएफ’चे संस्थापक संग्राम काकड यांनी फेसबुकच्या प्रॉडक्ट मॅनेजर चार्मीन हँग यांच्याकडे कल्पना मांडली. मात्र, त्यांनी त्याला प्रतिसाद न देता परस्पर फेसबुकने स्वतःच्या नावाने फिचर सुरु केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे आणि आपली कल्पना फेसबुकने चोरल्याचे लक्षात आले. याबाबत पुणे न्यायालयात दावा दाखल केला असून, आपल्याला न्याय मिळायला हवा, असा आशावाद ‘एमटीजेएफ’चे संस्थापक संग्राम काकड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

संग्राम काकड म्हणाले, “आम्ही फेब्रुवारी २०१८ ला हे ऍप सुरु करण्याआधी फेसबुकसोबत बोलणी केली होती. परंतु काहीही उत्तर न देता फेसबुकने आमच्या या ऍपची कॉपी करून स्वतःचे ऍप सुरु केले. फेसबुकने त्यांच्या या संकल्पनेची कॉपी करून ‘सिक्रेट क्रश’ नावाने नवीन ऍप सुरु केले. ‘एमटीजेएफ’ हे मोबाईल डेटिंग ऍप आहे. या ऍपमध्ये स्वतः च्या मित्रांसोबत आपली ओळख लपवून बोलता येत. या ऍपद्वारे मित्र मैत्रिणींना न घाबरता मनातल्या भावना व्यक्त करू शकतो.”

“या ऍपची नोंदणी आम्ही २०१७ मध्येच आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी केली होती. ‘एमटीजेएफ’च्या संकल्पनेचा वापर करून फेसबुकने मे २०१८ ‘सिक्रेट क्रश’ हे ऍप सुरु केले. त्याचे विपणनही ‘एमटीजेएफ’ची कल्पना वापरूनच करण्यात आले. फेसबुकची स्थापना २००४ मध्ये झाली होती. तेव्हाही झुकरबर्गने विंकलेव्हस ब्रदर्सकडून फेसबुक संकल्पना चोरल्याचा आरोप झाला होता. तेव्हापासून फेसबुकवर अनेक न्यायालयीन खटले चालू आहेत.”

Leave a Reply

%d bloggers like this: