fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENT

‘प्लॅनेट मराठी’च्या पहिल्या वेबसिरीजचा शुभारंभ

मागील काही महिन्यांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म विषयीची प्रतीक्षा अखेर संपली असून सातासमुद्रापार असलेल्या मराठमोळ्या प्रेक्षकांपर्यंत मराठी आशय पोहोचवण्याच्या उद्देशाने आणि मराठी कलाकारांना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या पहिल्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा आज पुण्यात शुभारंभ झाला. या वेबसिरीजचे नाव अद्याप गुलदस्त्यात असले तरी यात मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका असून आनंद इंगळे पाहुणे कलाकाराच्या भूमिकेत दिसतील. विप्लवा एंटरटेनमेंट्स प्रस्तुत संतोष गुजराथी निर्मित या वेबसिरीजचे दिग्दर्शक, लेखक मयुरेश जोशी आहेत. या पूर्वी विप्लवा एंटरटेनमेंट्सने ‘रुद्रम’, ‘कट्टी बट्टी’ यांसारख्या गाजलेल्या मालिका तसंच ‘नॉक नॉक सेलेब्रिटी’ हे लोकप्रिय नाटक प्रेक्षकांना दिले आहे.

मयुरेश जोशी यांनी आजवर अनेक आशयपूर्ण वेबसिरीज दिल्या आहेत. त्यामुळे या वेबसिरीजमध्येही प्रेक्षकांना काहीतरी वैविध्य पाहायला मिळणार हे नक्की. या वेबसिरीजबद्दल मयुरेश जोशी म्हणतात, ”आज आमच्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला असून आम्ही सगळेच चित्रीकरणासाठी खूप उत्सुक आहोत. सगळीच टीम माझ्या ओळखीची असल्याने त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येणार आहे. मुळात मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर, अभिजीत खांडकेकर हे सगळेच कसलेले कलाकार असल्यामुळे त्यांच्या सोबत काम करणे खूपच सोपे जाणार आहे. वेबसिरीजबद्दल सांगायचे झाले तर या वेबसिरीजचे नाव आम्ही इतक्यात उघड करणार नसून मी इतकंच सांगेन, की ही अतिशय अनोखी लव्हस्टोरी आहे. जी पहिल्यांदाच मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे. मुख्य म्हणजे ही वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी’ सारख्या दर्जेदार प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार असल्याचा आम्हाला अधिक आनंद आहे. आपली कलाकृती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी एवढीच प्रत्येक दिग्दर्शकाची अपेक्षा असते आणि ही अपेक्षा ‘प्लॅनेट मराठी’ च्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होईल.”

”आम्ही नेहमीच दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण आशय देण्यावर विशेष भर दिला आहे. आमच्या पहिल्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाला आज सुरुवात झाली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. खरंतर ‘प्लॅनेट मराठी’विषयी सुरुवातीपासूनच सर्वांना विशेष उत्सुकता होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आमच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि पुढेही करणार, याची आम्ही हमी देतो. त्यामुळे ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच यशस्वी होईल. ” अशी प्रतिक्रिया ‘प्लॅनेट मराठी’चे निर्माता, सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading